नऊ महिन्यानंतर उत्साह व आनंदाला उधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:19 IST2020-11-15T12:19:35+5:302020-11-15T12:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या नऊ महिन्यांपासून सण, उत्सव, घरगुती आणि सार्वजनिक समारंभ यांच्यावर असलेल्या बंधनांमुळे घराबाहेर फारसे ...

नऊ महिन्यानंतर उत्साह व आनंदाला उधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या नऊ महिन्यांपासून सण, उत्सव, घरगुती आणि सार्वजनिक समारंभ यांच्यावर असलेल्या बंधनांमुळे घराबाहेर फारसे न पडणाऱ्या नागरिकांनी दिवाळी पर्वात मात्र मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आनंद, उत्साह आणि चैतन्याचे दिवाळी पर्व उत्साहात साजरे केले. कोरोनाची भीती असली तरी आवश्यक उपाययोजना करून या आनंदात सर्वजण सहभागी होत असल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनानिमित्त व्यापारी प्रतिष्ठाने, घरोघरी पूजन करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. बाजारातील उलाढालीतही मोठी वाढ झाली.
यंदाच्या दीपोत्सवाला कोरोना आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीची किनार असली असली तरी त्यातला उत्साह आणि चैतन्य कमी झाले नाही. सर्वत्र अपूर्व उत्साहात दीपोत्सव साजरा केला गेला. सर्वत्र लक्ष, लक्ष दिव्यांच्या झगमगाटाने दाही दिशा उजळल्याचा भास निर्माण झाला. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर बाजारातील उलाढाल देखील गेल्या तीन ते चार दिवसांच्या तुलनेत अधिक झाली. सायंकाळी व्यापारी वर्गाने लक्ष्मी पूजन केल्यानंतर केलेल्या फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत उजळून निघाला.
यंदा कोरोना, लाॅकडाऊन, अवकाळीपासून, अतिवृष्टी याचा शेतकरी वर्गासह कामगार, सर्वसामान्य यांना सामना करावा लागला. त्याचा थेट परिणाम अर्थातच बाजारपेठेवर उमटला. दिवाळी पर्वाच्या आधीपर्यंत बाजारपेठेतील उलाढाल जेमतेमच असतांना वसुबारसपासून मात्र, अचानक उलाढाल वाढली, ग्राहकांनी खरेदीत उत्साह दाखविला. गेल्या पाच दिवसातील उलाढाल कोट्यवधींच्या घरात गेली. बाजारातील उलाढालीचा परिणाम अर्थातच चलन फिरण्यात झाल्याने दिवाळीचा उत्साह काही औरच राहिला. शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.
दिवाळी पर्वातील लक्ष्मीपूजनाला व्यापारीदृष्ट्या विशेष महत्त्व असते. दिवाळीच्या पाच दिवसातील तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. वर्षभरासाठी लागणाऱ्या नवीन चोपडी, खतावणी यांची पूजा करून व्यापारी नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ करतात. दिवसभर ग्राहकांची गर्दीनंतर सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून लक्ष्मी पूजनाची तयारी केली. त्यामुळे बाजारातील गर्दी ओसरली. तरी बाजारपेठेत लक्ष्मीपूजनामुळे वातावरणात चैतन्य पसरले होते.
सायंकाळी सात वाजेपासून फटाक्यांची आतशबाजी सुरू होती. लक्ष्मीपूजनानंतर तर मोठ्या प्रमाणावर आतशबाजी करण्यात आली. यंदा आकाशात विद्युत रोशणाई करणारे फटाके मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आल्याने आसमंत उजळून निघाला होता.
लक्ष्मीपूजनाचा उत्साह... : सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्साहात करण्यात आले. सायंकाळी सहा ते रात्री साडेसात व नऊ ते मध्यरात्रीपर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त होते. मोठ्या व्यापारी प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीपूजनाचा खास सोहळा होता. लक्ष्मी पूजनासाठी लागणारे बत्तासे, लाह्या, केरसूनी, ऊस आदींचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. व्यापा-यांचे नवीन आर्थिक वर्ष लक्ष्मीपूजनापासून सुरू होत असल्यामुळे खतावणी, चोपडी यांचे पूजन करण्यात आले. नवीन खतावणी व चोपडींवर आता सर्व आर्थिक व्यवहार लिहीले जाणार आहेत. खतावणीप्रमाणेच आता सर्व आर्थिक व्यवहाराचा आलेख व मांडणी ही संगणकावर राहत असल्यामुळे काही व्यापा-यांनी खतावणीसह संगणकाचेही पूजन केले.
झेंडू : २०० रुपये किलो...
झेंडूच्या फुलांचा भाव कायम होता. २०० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू होती. आवक अगदीच कमी होती. त्यामुळे नागरिकांनी इतर फुलांची खरेदी केली.
विद्यूत रोषणाईचा झगमगाट
इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यालयांच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे शहर उजळून निघाले.