यात्रेतून परतणाऱ्या युवकांच्या दुचाकीला अपघात, एकजण ठार, दुसरा जखमी
By मनोज शेलार | Updated: January 1, 2024 18:09 IST2024-01-01T18:08:57+5:302024-01-01T18:09:05+5:30
३१ डिसेंबर रोजी पहाटे ही घटना घडली

यात्रेतून परतणाऱ्या युवकांच्या दुचाकीला अपघात, एकजण ठार, दुसरा जखमी
मनोज शेलार, नंदुरबार: शहादा - शिरपूर रस्त्यावरील अनरदबारी ते कहाटूळ फाटा दरम्यान असलेल्या पोल्ट्री फार्मसमोर दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात असलोद येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबतचा दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ३१ डिसेंबर रोजी पहाटे ही घटना घडली.
राकेश आबा कोळी (३०) असे मयत युवकाचे नाव आहे, तर विराज नरेश पाटील (२८) हा गंभीर जखमी झाला. असलोद येथील हे दोन्ही युवक सारंगखेडा येथील यात्रेत गेले होते. पहाटे परत गावी जात असताना हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असलोद येथील राकेश कोळी व विराज पाटील हे त्यांच्या दुचाकीने ३० रोजी रात्री सारंगखेडा येथे यात्रेत गेले होते. पहाटे यात्रेतून परत गावी जात असताना शहादा - शिरपूर रस्त्यावर कहाटूळ फाटा ते अनरद दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत राकेश कोळी यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. विराज पाटील हा जखमी झाल्याने त्याला शहादा ग्रामिण रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.