अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 19:30 IST2020-11-11T19:29:41+5:302020-11-11T19:30:12+5:30

नंदुरबारमध्ये पर्यटनासाठी गेले असताना बुडून मृत्यू

ABVP national secretary drowns in Nandurbar | अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

नंदुरबार: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा मृत्यू झाला आहे. धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील उदय नदीवरील धबधब्यावर पर्यटनासाठी आले असताना अनिकेत यांचा बुडून मृत्यू झाला. ते मुंबईतल्या कुर्ला भागाचे रहिवासी होते.

तालुक्यातील बिलगाव येथे उदय नदीवर नैसर्गिक धबधबा आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भागातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. काल मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पाच युवक तालुक्यातील असली येथील पद्माकर वळवी नावाच्या मित्राकडे मुक्कामी आलेले होते. आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास या युवकांनी बिलगाव येथे धबधब्यावर फिरण्याचा बेत आखला. त्यानुसार बिलगाव येथे धबधब्यावर अंघोळ उरकून बाहेर येताना अनिकेत ओव्हाळ यांचा पाय दगडावर निसटला आणि त्यांचा तोल गेला. त्यांना वाचवण्यासाठी सिद्धेश्वर लटपटे व एका मित्राने पाण्यात उडी घेतली. त्यांच्या मदतीला गावकरीही धावले. मात्र, अनिकेत सापडले नाहीत. 

अनिकेत यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या सिद्धेश्वरच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचीही तब्बेत बिघडली. गावकऱ्यांच्या मदतीनं सिद्धेश्वरला वाचवण्यात यश आले. दरम्यान जवळपास १५ ते २० मिनिटांनी अनिकेतचा मृतदेह पाण्यावर दिसून आला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून अनिकेत यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अनिकेतला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिद्धेश्वरची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात आलं.
 

Web Title: ABVP national secretary drowns in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.