भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; एकजण ठार, दुसरा जखमी
By मनोज शेलार | Updated: April 29, 2023 18:56 IST2023-04-29T18:56:20+5:302023-04-29T18:56:30+5:30
नीलेश पवार याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर योगेश मराठे गंभीर जखमी झाला.

भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; एकजण ठार, दुसरा जखमी
नंदुरबार : भरधाव दुचाकीने आपल्या पुढे चालणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना विसरवाडीनजीक घडली. मयत व जखमी दोन्ही वरूड, ता.शिंदखेडा येथील रहिवासी आहेत. विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश रवींद्र पवार (२१) असे मयताचे नाव असून जखमीचे नाव योगेश पीतांबर मराठे (२८) असून दोन्ही रा.वरूड, ता.शिंदखेडा येथील रहिवासी आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, नीलेश पवार व योगेश मराठे हे आपल्या दुचाकीने (क्रमांक जीजे ०५ एलवाय ३७८१) विसरवाडीहून शिंदखेडा येथे जात होते. विसरवाडी गावाच्या त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे आपल्या पुढे चालणाऱ्या ट्रकला त्यांची दुचाकी धडकली. त्यामुळे दोन्ही रस्त्यावर फेकले गेले. नीलेश पवार याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर योगेश मराठे गंभीर जखमी झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत रवींद्र जयराम पवार यांनी खबर दिल्याने विसरवाडी पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अरुण कोकणी करीत आहे.