91 लाख वृक्ष लागवडीसाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:20 IST2019-06-14T12:19:54+5:302019-06-14T12:20:02+5:30

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वृक्षारोपण अभियानासाठी वनविभागाने सुसज्ज तयारी केली  आहे. वनविभागाबरोबरच इतर सर्व यंत्रणांच्या ...

91 lakhs trees are ready for cultivation | 91 लाख वृक्ष लागवडीसाठी सज्जता

91 लाख वृक्ष लागवडीसाठी सज्जता

वसंत मराठे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वृक्षारोपण अभियानासाठी वनविभागाने सुसज्ज तयारी केली  आहे. वनविभागाबरोबरच इतर सर्व यंत्रणांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात साधारण 91 लाख 50 हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन असल्याचे अभियानाच्या जिल्हा समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, यासाठी रोपेही उपलब्ध झाले आहेत.
हरित महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वर्षापासून वनविभागामार्फत वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या या अभियानामुळे निदान 50 ते 60 टक्के वृक्ष तरी जगत आहेत. साहजिकच बेसुमार वृक्षतोडीने  बोडका झालेल्या सातपुडय़ाला काही प्रमाणात गतवैभव प्राप्त होत आहे.
यंदाही जुलै महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात वनविभाग वृक्षारोपण अभियान राबविणार आहे. या अनुषंगानेच जिल्हा वनविभागानेही अभियानासाठी सुसज्ज तयारी केली आहे. सामाजिक वनीकरण, मेवासी वनविभाग, ग्रामपंचायती व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध प्रजातींच्या साधारण 91 लाख 45 हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वनविभागाबरोबरच संबंधित यंत्रणांनी आपले आवार, रस्त्यांच्या दुतर्फा, वनविभागाचे कूप याठिकाणी खड्डेही तयार केले आहेत. वनविभाग व सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांनी दोन नर्सरी उभारल्या असून तेथून साधारण एक कोटी सहा लाख रोपे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे रोपांची अडचण येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र यासाठी मोठय़ा प्रमाणात लोकसहभागाची आवश्यकता आहे. तशी अपेक्षाही वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे.
विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड
येत्या 1 जुलैपासून सुरू होणा:या वृक्षारोपण अभियानात प्रामुख्याने  महू, आवळा, जांभूळ, चिंच, चारोळी, बांबू, साग, सिसम, बोर, लिंब, खैर, गुलमोहर, आंबा, सीताफळ, खिरणी आदी वेगवेगळ्या 50 ते 55 प्रजातींची लागवड  करण्यात येणार आहे. यासाठी  खुद्द वनविभाग व सामाजिक  वनीकरण या दोन्ही यंत्रणांनी  प्रशस्त अशा रोपवाटिका तयार केल्या आहेत. या नर्सरीमधून जवळपास सव्वा कोटी वृक्षांची रोपेही उपलब्ध आहेत. जेथे ज्या रोपांची मागणी होईल त्याप्रकारची रोपे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त सीताफळ, आंबा, महू, साग या प्रजातींची रोपे तयार केली आहेत. कारण या वृक्षांपासून आदिवासींना रोजगारही उपलब्ध होणार आहे. गेल्यावर्षीही याच वृक्षाची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
गेल्यावर्षाची 70 टक्के
झाडे जगल्याचा दावा
गेल्यावर्षी वनविभागाकडून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी 70 टक्के झाडे जगल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परंतु हा वनविभागाचा दावा असला तरी प्रत्यक्षात हा दावा कितपत खरा आहे याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण इतर यंत्रणांमार्फत लावण्यात आलेली झाडे केव्हाच नष्ट झाली आहे. तेथे केवळ खड्डय़ांचेच अस्तित्व दिसून येत आहे. तळोदा येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्यावर्षी प्रशासनाने वृक्षारोपण केले होते. पाण्याअभावी ती वृक्ष नाहीशी झाली. आज तेथे केवळ सांगाडेच पडले आहेत. वास्तविक वृक्ष लागवडीसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असते. शिवाय अभियानाबाबत अतिशय संवेदनशील असताना दुसरीकडे शासनाचीच यंत्रणा किती असंवेदनशील आहे याचे वास्तव चित्र तळोदा प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील वृक्षांबाबत दिसून येते.  वृक्ष संवर्धनाबाबत प्रशासनाच्या  अशा असंवेदनशील वृत्तीबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या वर्षात वनविभाग, 39 लाख 60 हजार, सामाजिक वनीकरण 20 लाख पाच हजार, मेवासी वनविभाग 15 लाख 45 हजार, ग्रामपंचायत विभाग 19 लाख पाच हजार आणि इतर शासकीय यंत्रणा पाच लाख 40 हजार झाडे लावणार आह़े 

 

Web Title: 91 lakhs trees are ready for cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.