जिल्ह्यातील २१२ मतदान केंद्रांसाठी ८०० कर्मचारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:33 IST2021-01-11T12:33:11+5:302021-01-11T12:33:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी १ लाख १३ हजार मतदार मतदान ...

जिल्ह्यातील २१२ मतदान केंद्रांसाठी ८०० कर्मचारी नियुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी १ लाख १३ हजार मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांना जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या केंद्रांसाठी जिल्ह्यातून एकूण ८०० कर्मचारी नियुक्त केले जावू शकतात.
नंदुरबार तालुक्यातील सात, शहादा २१, तळोदा सात, धडगाव, १६, नवापूर १२ तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. सुमारे २०० प्रभागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत १ हजार २२९ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता मतदान कर्मचारी नियुक्तीचा कार्यक्रमही अंतिम झाला आहे. रविवारी सर्वच तहसीलस्तरावर एक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यातून मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. संक्रांतीच्या दिवशी या कर्मचा-यांना तालुकास्तरावर बोलावून मशिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी मशिन्सची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. दरम्यान शहादा तालुक्यातील सर्वाधिक २१ गावांमध्ये मतदान होणार आहे. एकूण ७१ प्रभागात होणा-या मतदान कार्यक्रमासाठी रविवारी प्रशिक्षण घेण्यात आले.
या खालाेखाल धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या ५३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सुमारे २५ हजार मतदारांना मतदान करता यावे यासाठी तालुका प्रशासनाकडून मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यातील २३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रियेचे नियोजन प्रशासनाने केल्याची माहिती देण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील ३५ प्रभागातील मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोना चाचण्यांची टांगती तलवार
दरम्यान एकीकडे ग्रामपंचायत निवडणूकांची तयारी सुरु असली तरी दुसरीकडे कर्मचा-यांच्या कोरोना तपासण्या कराव्यात अशा सूचना राज्य शासनाच्या आहेत. परंतू जिल्ह्यात मात्र केवळ कर्मचा-यांचे थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर नोंद करण्यात येत आहे. यातून एखाद्या कर्मचा-यास लक्षणे असल्यास त्याच्या तपासण्या करुन घेण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी प्रशासन आरोग्य विभागाची मदत घेत असल्याची माहिती देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना तालुकास्तरावर आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी प्रत्येकी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या पथकांकडून सातत्याने निवडणूकांमध्ये होणारा खर्च आणि प्रचारातील मुद्दे तपासले जात आहेत. पथकांकडून गावोगावी भेटीही दिल्या जात आहेत.