पपईचे ७० झाडे तोडून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:33 IST2020-11-05T11:32:34+5:302020-11-05T11:33:24+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : आडगाव, ता.शहादा येथील शेतकऱ्याची गणोर शिवारात शेती असून, शेतात लावण्यात आलेली पपईची ७० ...

पपईचे ७० झाडे तोडून फेकली
n लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : आडगाव, ता.शहादा येथील शेतकऱ्याची गणोर शिवारात शेती असून, शेतात लावण्यात आलेली पपईची ७० झाडे अज्ञान इसमाने कापून फेकल्याने पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत म्हसावद पोलिसात अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, आडगाव, ता.शहादा येथील शेतकरी राजेंद्र मोरसिंग ठाकरे यांनी आपल्या गणोर शिवारातील चार एकर शेतात पपई लावली आहे. मात्र मंगळवारी रात्री अज्ञात इसमाने पपईची झाडे कापून फेकून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे हिरावले जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवर पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यात संबंधित शेतकऱ्याचे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. म्हसावद, सुलवाडे, धुरखेडा परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या घटना वाढत असून, पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. याबाबत म्हसावद पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नामदेव बिऱ्हाडे तपास करीत आहे.
दरम्यान, यापूर्वीही शहादा तालुक्यात पपई, केळी, कपाशीची झाडे शेतातच उपटून फेकण्याचे प्रकार घडले आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात वेळोवेळी गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी ठोस उपाययोजना करून असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.