67 गाव-पाडय़ांसाठी खाजगी विहिरी अधिग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:41 IST2019-06-10T12:41:53+5:302019-06-10T12:41:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाळा लांबतो आहे तशी पाणी टंचाईच्या झळा देखील तीव्र होत आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ...

67 Acquired private wells for village ponds | 67 गाव-पाडय़ांसाठी खाजगी विहिरी अधिग्रहीत

67 गाव-पाडय़ांसाठी खाजगी विहिरी अधिग्रहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाळा लांबतो आहे तशी पाणी टंचाईच्या झळा देखील तीव्र होत आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 67 गावांमध्ये खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. दोन पाडय़ांवर टँकरद्वारे तर दोन गावे व त्याच्या पाडय़ांवर गाढवांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी महिनाभर लांबल्यास भिषण स्थिती निर्माण होणार आहे. 
यंदाची पाणी टंचाई भिषण स्वरूप धारण करणारी ठरली आहे. जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा अधीक गावांना व हजारापेक्षा अधीक पाडय़ांना पाणी टंचाईची झळ यंदा बसली आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही गावे पाण्यासाठी होरपळताहेत. मार्च महिन्यापासून तर टंचाईची तीव्रता अधीकच वाढली आहे. ज्या गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत त्या विहिरी देखील कोरडय़ा झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्या भागात धरणे आणि बॅरेजस जवळ आहेत त्या भागात थेट तेथून पाईपलाईन करून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. 
240 गावे टंचाईग्रस्त
जिल्ह्यातील 240 गावे पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत आहेत. सर्वाधिक 109 गावे ही नंदुरबार तर 80 गावे ही शहादा तालुक्यातील आहेत. सर्वाधिक पाडे ही अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आहेत. जवळपास पाच लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत आहेत. आतार्पयत जवळपास एक कोटीपेक्षा अधीक रक्कम यासाठीच्या उपाययोजनांवर खर्च झाली आहे. नवापूर तालुक्यातील 19, तळोदा तालुक्यातील 25 गावांना देखील दुष्काळाचा फटका बसला आहे. 
अधिग्रहीत विहिरी आटल्या
टंचाईग्रस्त गावाला उपाययोजना म्हणून गाव शिवारातील खाजगी विहिर किंवा विंधन विहिर अधीग्रहीत करण्यात आल्या होत्या. आतार्पयत एकुण 67 ठिकाणी अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 58, शहादा तालुक्यात सात तर धडगाव तालुक्यात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यापैकी अनेक विहिरी, विंधन विहिरी आटल्या आहेत. परिणामी अशा गावांना पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 
उपाययोजनांना गती
टंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यासाठी केलेल्या नियोजनातील अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. 13 ठिकाणी विहिर खोल करणे किंवा गाळ काढण्याचे प्रस्तावीत होते ते सर्व ठिकाणी झाले आहे. टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याचे 20 ठिकाणी प्रस्तावीत होते, पैकी केवळ दोन ठिकाणी टँकर सुरू आहे. नव्याने विंधन विहिरी घेण्याचे 302 ठिकाणी प्रस्तावीत होते. त्यापैकी अडीचशे ठिकाणी ते झाले आहे. परंतु विंधन विहिरींवर मशिनरी बसविण्यात न आल्याने त्यांचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना 19 ठिकाणी घेण्याचे प्रस्तावीत होते. त्यातही अपेक्षीत प्रगती झालेली नसल्याची स्थिती आहे. 
पावसाळा लांबल्यास..
पावसाळा लांबल्यास टंचाई ग्रस्त गावांची स्थिती आणखी भिषण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. 

जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांना टँकरची मागणी केली आहे. परंतु या ना त्या कारणाने प्रशासन ते टाळत आहे. चारा छावणीप्रमाणेच टँकरचेही नियम किचकट आहेत. त्या फंद्यात प्रशासन पडत नसल्याचे एकुणच चित्र आहे. त्यामुळे केवळ धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा येथेच दोन टँकर सुरू आहेत. 
तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील गाव पाडय़ांवर रस्ता नाही अशा ठिकाणी गाढवांवरून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात कोयलीडाबर आणि चिडीमाळ या दोन गाव व पाडय़ांचा समावेश आहे. प्रती माणसी तीन लिटर पाणी या द्वारे पुरविले जात असल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: 67 Acquired private wells for village ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.