२७ हजार शेतकरी खरीप कर्जाला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:54 IST2020-05-10T11:54:03+5:302020-05-10T11:54:13+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ ...

२७ हजार शेतकरी खरीप कर्जाला मुकणार
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली असतांना अशा संकटाच्या काळात जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ५०० शेतकरी शासनाच्या आश्वासनाला बळी ठरून यंदाच्या खरीप कर्जालाही मुकणार आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम घ्यावा कसा या विवंचनेत हे शेतकरी आहेत.
राज्य शासनाने मोठी गाजा वाजा करून गेल्या वर्षी कर्ज माफीची घोषणा केली होती. या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ५०४ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांची यादी पोर्टलवरही जाहीर करण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असतांना जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या आचार संहितेच्या कारणाने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आचार संहिता लांबल्याने कर्जमाफीची प्रक्रियाही रेंगाळली. याच काळात कोरोनाचे संकट उभे ठाकले त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे.
सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. अनेकांनी कापूस लागवडीची तयारीही केली आहे. त्यासाठी खरीप कर्जाची प्रक्रिया बँकांनी सुरू केली आहे. मात्र कर्जमाफी घोषित झालेले २७ हजार शेतकरी अद्यापही शासनाच्या दप्तरात कर्जदार आहेत.
यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता त्यांना बँकांनी कर्ज द्यावे, अशी शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे पात्र शेतकरी केवळ बँकांच्या चकरा मारत आहेत. त्यांना खरीप कर्ज मिळत नसल्याने खरीपाची तयारी करावी कशी असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी देशोधडीला लागत आहे. गेल्या वर्षाचा कापूस व इतर धान्य माल अजून घरातच पडून आहे. विक्रीसाठी अनेक अडथळे येत आहेत. बागायतदार शेतकºयांचे हालही अधिकच वाईट आहे. केळी व पपई खरेदीसाठी वेळेवर व्यापारी येत नसल्याने निम्मा माल शेतातच सडला.
व्यापारी मिळाले पण भाव नसल्याने ही शेतीदेखील तोट्याची ठरली. अशा स्थितीत कर्जमाफीबाबतही अनिश्चितता निर्माण होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असले तरी त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बँकांच्या यादीत अद्यापही ते थकबाकीदार आहेत. या शेतकºयांना कर्ज देण्याबाबत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अद्यापतरी त्याबाबतचे कुठलेही आदेश बँकांना नाही. तसे आदेश आल्यास कर्जमाफीतील शेतकºयांना कर्ज देता येईल. इतर शेतकºयांना मात्र कर्जदेणे सुरू आहे.
-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा बँक धुळे.
२१५ कोटींचे कर्ज माफ
जिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीत २७,५०४ शेतकरी पात्र आहेत. त्यातील १३,१९१ शेतकºयांना विविध १३ बँकांनी कर्ज दिले आहे तर जिल्हा बँकेने १४,३१३ शेतकºयांना कर्ज दिले आहे. या सर्व शेतकºयांना एकुण २१५ कोटी सात लाख रुपयांचे कर्ज माफीचा फायदा होणार आहे.