३० हजार शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:31+5:302021-01-10T04:24:31+5:30
नंदुरबार : गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून ...

३० हजार शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत
नंदुरबार : गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात जिल्हा प्रशासन इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर राहिले. दोन वर्षांत तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली असून, तिचा आकडा जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक आहे.
जिल्ह्यात २०१९ व २०२० मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबत भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात आले होते. २०१९ च्या नुकसान भरपाईची रक्कम कोरोनामुळे काहीकाळ लांबली होती. परंतु लॅाकडाऊन शिथिल होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. दोन वर्षांत तब्बल ३० हजार शेतकऱ्यांना २५ कोटींपेक्षा अधिक रक्कम दिली गेली आहे. ऐन कोरोनाकाळातील अडचणीच्या वेळी ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याने मोठा आधार मिळाला होता.
जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबाबत १२ हजार १५० शेतकऱ्यांना १६ कोटी ५२ लाखांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात दोन हजार ७५४ शेतकऱ्यांना ४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली. नवापूर एक हजार १३५ शेतकऱ्यांना ५३ लाख ६८ हजार रुपयांची नुकसानभरपाई, शहादा तालुक्यातील तीन हजार ३६१ शेतकऱ्यांना सहा कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप झाली. तळोदा तालुक्यात दोन हजार ६९९ शेतकऱ्यांना दोन कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यात एक हजार १०० शेतकऱ्यांना ९६ लाख ३४ हजार आणि धडगाव तालुक्यात एक हजार १०१ शेतकऱ्यांना ५४ लाख २८ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.
जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत जिल्ह्यातील १६ हजार १२४ शेतकऱ्यांना आठ कोटी ६० लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात ४७२ शेतकऱ्यांना ३२ लाख पाच हजार रुपये मदत, नवापूर तालुक्यातील चार हजार ८३६ शेतकऱ्यांना एक कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम, शहादा तालुक्यातील एक हजार २९९ शेतकऱ्यांना ९० लाख ४८ हजार रुपयांची, तळोदा तालुक्यात ९०४ शेतकऱ्यांना ४४ लाख ७८ हजार रुपयांची, अक्कलकुवा तालुक्यात दोन हजार ३६४ शेतकऱ्यांना एक कोटी २८ लाख आणि अक्राणी तालुक्यात सहा हजार २४९ शेतकऱ्यांना चार कोटी सात लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.
उर्वरित शेतकऱ्यांनादेखील मदत वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरच पूर्ण होणार असून, बाधित १०० टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवून देण्यात जिल्हा आघाडीवर राहणार आहे.