२०२० मध्ये कोरोनाचा हाहाकार फोफावणाऱ्या डेंग्यूनेही पत्करली हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:33 IST2021-02-06T12:33:36+5:302021-02-06T12:33:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २०२० हे वर्ष कोरोना महामारीमुळे कायम स्मृतीत राहणार आहे. लाॅकडाऊनच्या कटूगोड आठवणी स्मरणात असताना ...

२०२० मध्ये कोरोनाचा हाहाकार फोफावणाऱ्या डेंग्यूनेही पत्करली हार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २०२० हे वर्ष कोरोना महामारीमुळे कायम स्मृतीत राहणार आहे. लाॅकडाऊनच्या कटूगोड आठवणी स्मरणात असताना जिल्ह्याच्या विविध भागात वर्षभर संसर्ग होवून नागरीकांना अडचणीच्या ठरणा-या आजारांमध्ये मात्र घट आल्याचे चित्र गेल्या वर्षात आकडेवारीवरुन समोर आले आहे. यात प्रामुख्याने डेंग्यूचा समावेश असून गेल्या २०१६ ते २०१९ या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०२० मध्ये अगदी नगण्य असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहिम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात डेंग्यूचा आढावा घेतल्यास २८८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. २०१२ मध्ये दोन तर २०१३ मध्ये ३ अशा एकूण पाच जणांचा बळी गेल्यानंतर सातत्याने डेंग्यूचे सर्वेक्षण सुरु आहे. यातून २०१९ हे वर्ष वगळता इतर वर्षात मात्र डेंग्यू नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची संख्या अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे.
२०२० या संपूर्ण वर्षात केवळ ३०१ संशयित रुग्ण आढळून आल्याचे हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातील आठ जण डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आले होते. जिल्ह्यात डेंग्यू बाधितांची संख्या अचानक कमी झाली असली तरीही विभागाकडून सर्वेक्षण मात्र सुरु असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. रविंद्र ढोल यांच्याकडून देण्यात आली आहे.
नंदुरबार, नवापूर आणि शहादा तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या अधिक
डेंग्यू नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी आरोग्य सेवक, हिवताप कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात येते. या पथकांकडून घरोघरी भेटी देत, पाहणी करण्यात येते. यावेळी साठा केलेल्या पाण्यात एडीस डासाची पैदास करणा-या अळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. अळ्या आढळुून आल्यास त्याठिकाणी ॲबेटिंग करण्याचा उपक्रम पार पाडण्यात येतो. जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने यावर कामकाज करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकतात अडचणी
- एडिस डासाने चावा घेतल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवस विविध लक्षणे जाणवल्यास डेंग्यूची तपासणी करुन घेण्याचे हिवताप विभागाकडून सूचित केले जाते. यात संपूर्ण अंगदुखी आणि सांधेदुखीची तक्रार समोर येते.
- बाधित रुग्णाला वारंवार ताप येण्यास सुरुवात होते. तापाचे प्रमाण अधिक असल्यास तातडीने डेंगयूची चाचणी करण्याचा सल्ला विभागाकडून देण्यात येतो. तापादरम्यान डोळ्यांच्या खोबणीत दुखण्याचे प्रमाणही जाणवते.
- ताप आणि अंगदुखी जाणवत असतानाच पाच ते सात दिवस अंगावर लाल रंगाचे चट्टे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यातून डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे तातडीने योग्य ते उपचार घेतल्यास डेंग्यू बरा होतो.
- जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मात्र सातत्याने आढळून येतात. २०१९ या वर्षात ताप असलेले २००२ संशयित रुग्ण समोर आले होते.
२०१६ ते २०२० या काळातील रुग्ण
२०१६- १२५
२०१७-०६ २०१८ -०५ २०१९-१५३ २०२० -०८