२०० बेडचा कोवीड कक्ष लवकरच सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:57 IST2020-05-31T11:57:27+5:302020-05-31T11:57:35+5:30
संडे स्पेशल मुलाखत साधन आणि सुविधा यांचा बाऊ न करता काम करणे आणि रुग्णामध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर संकटावर मात करता येते- डॉ.राजेश वसावे

२०० बेडचा कोवीड कक्ष लवकरच सज्ज
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोवीड कक्षात आलेल्या रुग्णामध्ये आधी विश्वास निर्माण करावा लागतो, त्याचा बरा होण्याचा आत्मविश्वास आणि औषधोपचार यांची सांगड घालून रुग्ण कोरोनामुक्त करण्यात येत आहे. यासाठी या कक्षातील डॉक्टरपासून स्वच्छता कर्मचारीपर्यंत सर्वांची मेहनत आहे. त्यामुळेच ३२ पैकी १९ रुग्ण बरे करू शकलो अशी माहिती नंदुरबार कोवीड कक्षाचे प्रमुख डॉ.राजेश वसावे यांनी दिली. त्यांच्याशी केलेली बातचीत...
कोवीड कक्षात बेडची संख्या पुरेशी आहे का?
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात सद्य स्थितीत बेडची संख्या पुरेशी आहे. असे असले तरी १०० बेडचा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला आहे. येत्या काही दिवसात २०० बेडचा कक्ष तयार होत आहे. त्यामुळे बेडची समस्या निर्माण होणार नाही हा विश्वास आहे.
औषधी आणि कर्मचाऱ्यांसाठी साहित्याची काय स्थिती आहे?
जिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटीलेटर आहेत. त्यापैकी दोन व्हेंटीलेटर येथे उपलब्ध आहेत. दोन स्टॅण्डाबाय आहेत. औषधी साठा देखील पुरेसा आहे. मागणीप्रमाणे तो उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि आवश्यक ते सर्व साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णांसाठीही सर्व सुविधा कक्षात पुरविल्या जात आहेत. त्यामुळेच बरे होऊन गेलेले रुग्ण दुवा देवून जातात.
किती कर्मचाºयांची नेमणूक आणि त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे?
कोवीड कक्षात कर्मचाºयांची सहा तासांची ड्युटी असते. तर डॉक्टरांची नेमणूक ही २४ तास असते. यात एक मुख्य डॉक्टर, एक सह डॉक्टर, एक सिस्टर, एक शिपाई, दोन स्वच्छता कर्मचारी, रेडिओलॉजिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहायक यांचा समावेश आहे. सात दिवस ड्युटी असते. २१ दिवसाचे रोटेशन करण्यात आले असून सिव्हीलमधील प्रत्येकाला ड्युटी देण्याचे नियोजन आहे.
कोवीड कक्षात नियुक्त कर्मचारी कोरोनामुक्त राहावे यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले, परंतु त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. कर्मचाऱ्यांचे नियमित स्वॅब घेतले जात आहेत.
समन्वयामुळेच शक्य... कोवीड कक्षात दाखल कोरोना रुग्ण आणि बरे होण्याचे प्रमाण हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. हे सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, सीएस, पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयातून होणाऱ्या कामामुळेच आणि मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळात लोकप्रतिनिधी, सामजिक संस्था, जागृक नागरिक यांनी मिळून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व घटकांचे समन्वय आणि सहकार्य राहिल्यास येणारा काळ कितीही वाईट असला तरी त्यावर मात करणे सहज शक्य होणार आहे.