तीन आरोग्य केंद्रांसाठी १२ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:12 IST2019-05-06T12:12:47+5:302019-05-06T12:12:54+5:30

तळोदा तालुका : बोरद, प्रतापपूर व सोमावल आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम

12 crores fund for three health centers | तीन आरोग्य केंद्रांसाठी १२ कोटींचा निधी

तीन आरोग्य केंद्रांसाठी १२ कोटींचा निधी

तळोदा : तालुक्यातील बोरद, प्रतापपूर व सोमावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती अतिशय जीर्ण झाल्याने त्यासाठी राज्य शासनाने १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या केंद्रांचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या परिसरातील नागरिकांना संपूर्ण आरोग्य सुविधा मिळणार असल्या तरी दवाखान्याचे बांधकाम तकलादू न करता दर्जेदार करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद, प्रतापपूर व सोमावल ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे गेल्या ५० ते ५५ वर्षापासून उभारण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांना त्या-त्या परिसरातील साधारण ३० ते ४० गावे जोडली आहेत. त्यामुळे तेथील रुग्ण उपचारासाठी जात असतात. परंतु या आरोग्य केंद्रांच्या इमारती अतिशय जीर्ण झाल्या आहेत. पावसाळ्यात तर त्यांना नेहमीच गळती लागत असते. अशाच स्थितीत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असे. त्यातही प्रतापपूर व बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पार दुरवस्था झाली आहे.
प्रतापपूर केंद्रात गेल्या चार वर्षांपूर्वी दोन बालकांची दुर्देवी घटना घडली होती. या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींसाठी तेथील आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीटदेखील केले होते, अशी वस्तुस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडून नवीन इमारतींसाठी शासनाकडे साधारण साडेबारा कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून अखेर तिन्ही आरोग्य केंद्रांना जवळपास १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
या निधीतून तिन्ही केंद्रात सुसज्ज इमारती बांधण्यात येणार आहेत. यात बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, प्रसुतीगृह, वैद्यकीय अधिकारी कक्ष, वेगवेगळे पुरूष-स्त्री वॉर्ड, प्रशस्त प्रयोग शाळा, औषध भांडार, अशा वेगवेगळ्या खोल्या राहणार आहेत. याशिवाय रुग्णांसाठी जनरल वॉर्डदेखील राहणार आहे. इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी जुन्या इमारती पाडण्याची परवानगीही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बांधकाम करीता शासनाकडून संबंधीत विभागास साधारण ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे समजते. शासनाने आता या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मुबलक निधी मंजूर केल्याने रुग्णांची गैरसोय दूर होणार आ हे. परंतु त्यासाठी इमारतींचे बांधकाम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Web Title: 12 crores fund for three health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.