नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक
By शिवराज बिचेवार | Updated: September 4, 2023 19:02 IST2023-09-04T19:02:10+5:302023-09-04T19:02:33+5:30
नांदेडच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या, तर दुसरीकडे नांदेड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.

नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक
नांदेड- जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी राज कॉर्नर येथून हजारो मराठा समाजबांधवांनी पदयात्रा काढून नांदेड बंदची हाक दिली होती. ही पदयात्रा श्रीनगर परिसरात आल्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यालयाच्या फलकावर काही जणांनी दगड भिरकावले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच नांदेड शहरात इतरही काही ठिकाणी दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या.
सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नांदेड बंदची हाक दिली हाेती. सकाळी साडेअकरा वाजता राज कॉर्नर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. दरम्यान, पदयात्रेत सहभागी काही तरुणांनी श्रीनगर, अण्णा भाऊ साठे चौक, शिवाजीनगर, नवी आबादी परिसरात काही दुकानांवर दगडफेक केली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकल मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. सकाळपासूनच नांदेडच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या, तर दुसरीकडे नांदेड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.