नांदेड : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी एका तहसीलदाराविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून न्यायालयाने त्याची रवानगी कोठडीत केली आहे. अविनाश श्रीराम शेंबटवाड असे आरोपी तहसीलदाराचे नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेला व सध्या गडचिरोली जिल्ह्यात (धानोरा) तहसीलदार म्हणून कार्यरत असलेला अविनाश श्रीराम शेंबटवाड याचे लग्न दीड वर्षापूर्वी मगनपुरा भागातील तरुणीशी झाले होते. लग्नावेळी मानपाने, सोने व अन्य साहित्य देऊन मुलींच्या वडिलांनी विवाह करुन दिला होता. लग्नानंतर तुला मुलबाळ होत नाही, असे म्हणत तहसीलदार अविनाश शेंबटवाड व त्याच्या कुटुंबियांनी विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच मुलबाळ होण्यासाठी अघोरी कृत्य, जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. विवाहिता पतीसोबत त्याच्या कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना काही ना काही कारण काढून तिला मारहाण केले. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलही रोखली.
या प्रकरणी विवाहितेने नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार पती अविनाश शेंबटवाड याच्यासह त्याची आई, वडील व डॉक्टर असलेल्या दोन भावाविरुद्धही छळवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सदरील आरोपी नांदेडात असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्यास १३ एप्रिल रोजी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे हे करीत आहेत.