उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार
By शिवराज बिचेवार | Updated: August 28, 2023 17:59 IST2023-08-28T17:59:34+5:302023-08-28T17:59:45+5:30
या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार
नांदेड- कंधारच्या उर्सानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटो का लावला म्हणून वाद घालत चार जणांनी एका तरुणावर खंजरने सपासप वार करुन खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बिजली हनुमान मंदिर ते हडको पाण्याची टाकी या रस्त्यावर २६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तोहसीफ शेर अली रा.नवी आबादी, शिवाजीनगर हा मित्रासोबत एम.एच.२६, सीजी ८२६२ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन २६ऑगस्ट रोजी कंधार येथील उर्साला गेला होता. ऊर्सामध्ये दर्शन घेवून रात्रीच्या वेळी तो कंधारहून नांदेडला किवळा मार्गे परत येत होता. यावेळी तोहसीफ यांच्या पाठीमागून चार चाकी आली. त्यांनी तोहसीफ यांच्या दुचाकीला कट मारला. तसेच कार दुचाकीपुढे लावून अडविले.
त्यानंतर कारमधून उतरलेल्या शाहरुख, सोहेल, अरबाज आणि विलायत सर्व रा.नवी आबादी यांनी तु कंधारच्या उर्सात बॅनरवर फोटो का लावला म्हणून वाद घातला. तसेच चाकूने तोहसीफ यांच्या खांद्यावर, बरगडीत, छातीवर सपासप वार केले. त्यामुळे तोहसीफ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले हाेते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधीक्षक सुशील नायक, पोनि.जगदिश भंडरवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तोहसीफ याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.