वैद्यकीय अधीक्षकाची दीड महिन्यात बदली पद भरले कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:47+5:302020-12-27T04:13:47+5:30
किनवट : गेल्या दीड वर्षानंतर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद भरले होते. मात्र, अवघ्या महिनाभरातच गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे ...

वैद्यकीय अधीक्षकाची दीड महिन्यात बदली पद भरले कशाला?
किनवट : गेल्या दीड वर्षानंतर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद भरले होते. मात्र, अवघ्या महिनाभरातच गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल नसीर बारी यांची ग्रामीण रुग्णालय लोहा येथे बदली करण्यात आल्याने हे पद भरलेच कशाला ? असा सवाल रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गंगन्ना नेम्मानीवार यांनी केला आहे.
जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट तालुक्यात गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित असून, येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्तच होते. १५ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अब्दुल नसीर बारी यांची गोकुंदा येथे पदस्थापना झाली होती. शासन आदेश दि. १५ सप्टेंबर २०२० अन्वये देण्यात आलेल्या पदस्थापनेत बदल करून सुधारित पदस्थापना ग्रामीण रुग्णालय लोहा येथे देण्यात आली आहे. मग दीड-दोन महिन्यांसाठी वैद्यकीय आधीक्षकांचे पद का भरले ? असा प्रश्न नेम्मानीवार यांनी उपस्थित केला आहे.
किनवट या आदिवासी भागात बदली करून येथे रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याने या भागाला कोणी वाली नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच येथील बरीच पदे रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी पुन्हा आपल्या सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात हा तालुका दुर्लक्षित होऊ पाहत असल्याचे चित्र आहे. दीड-दोन महिन्यांनंतर पुन्हा गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा कारभार प्रभारी देण्यात आला आहे.