वेळप्रसंगी समाजासाठी राजीनामाही देऊ; मराठा आरक्षणासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवा- खासदार संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST2021-05-26T04:19:06+5:302021-05-26T04:19:06+5:30
खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ते ...

वेळप्रसंगी समाजासाठी राजीनामाही देऊ; मराठा आरक्षणासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवा- खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ते मंगळवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते.
दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत त्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि आरक्षण अभ्यासक यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार संभाजीराजे म्हणाले, आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची गरज आहे. परंतु हा लढा कार्यकर्त्यांनी नाही तर त्यांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार यांनी उभा करण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणे हा एक भाग आहे. पण त्यासोबतच इतर पर्यायी मार्ग काय आहेत हे शोधण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो याचा अभ्यास या दौऱ्यादरम्यान करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. कोरोना काळात जनतेने रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, आपण केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांना भेटून आरक्षणप्रश्नी चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर आपण काय ती भूमिका माध्यमासमोर २७ किंवा २८ मे रोजी मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राजे काय भूमिका घेणार याकडे सबंध समाजाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा समाजाचे नुकसान होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना करता येतील? सारथीचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह आदींबाबत काही धोरण निश्चित करता येईल का, असे अनेक मार्ग आणि पर्याय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चिले जाणार आहेत, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर सडकून टीका करत अशा लेखकांना महाराष्ट्रात फिरकू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून या दौऱ्याला कोल्हापूर इथून सुरुवात झाली कोल्हापूर-पंढरपूर-सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-नांदेड असा त्यांचा दौरा झाला आहे. पुढे ते जालना, औरंगाबाद असा दौरा करणार आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे बोलले जाते.