इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 AM2019-02-20T00:46:31+5:302019-02-20T00:48:22+5:30

विष्णूपुरी प्रकल्पातील झपाट्याने कमी होणाऱ्या पाण्याची चिंता नांदेडकरांना लागली असून, केवळ जवळपास ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा विष्णूपुरीत उरला आहे.

Waiting for Isapur's water | इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा

इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्दे‘विष्णूपुरी’त झपाट्याने घट अवैध पाणीउपसा रोखणारी पथके कागदावरच

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातील झपाट्याने कमी होणाऱ्या पाण्याची चिंता नांदेडकरांना लागली असून, केवळ जवळपास ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा विष्णूपुरीत उरला आहे. परिणामी आता इसापूर प्रकल्पाच्या पाण्याचे महत्त्व वाढले असून इसापूर प्रकल्पातील दुसºया टप्प्यांतील पाणी कधी येईल, याकडे आता लक्ष लागले आहे.
इसापूर प्रकल्पातून दोन दलघमी पाणी नांदेडसाठी सोडण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. यापूर्वी दोन दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यातील एक दलघमी पाणी सांगवी बंधाºयापर्यत पोहोचले. दुस-या टप्प्यातील पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी कॅनालद्वारे हे पाणी आसना नदीच्या सांगवी बंधा-यात पोहोचणार नाही. जवळपास ७७ किलोमीटर अंतर पार करुन हे पाणी सांगवी बंधा-यात पोहोचेल. त्यानंतर काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सदर पाणी उत्तर नांदेडला पुरविले जाणार आहे. या आठवड्यात पाणी उपलब्ध झाल्यानंतर उत्तर नांदेडची जवळपास २० ते २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरी प्रकल्पावरील ताण थोडा कमी होणार आहे.
दुसरीकडे, विष्णूपुरी प्रकल्पातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सात पथकांंनी गाशा गुंडाळला आहे. परिणामी अवैधरित्या होणारा पाणी उपसा जोमाने सुरु आहे. अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेले पथके महावितरण, पोलीस विभाग तसेच अन्य विभागाच्या असहकार्यामुळे गुंडाळण्यात आले. याबाबत महापालिकेच्या १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांच्या दबावातूनच पाणीउपसा रोखण्याची कारवाई थांबविल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. अवैध उपसा रोखण्यासाठी पथके कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली जाईल, अशी माहिती आयुक्त लहुराज माळी यांनी महापालिका सभागृहात दिली होती. पथकांच्या स्थापनेबाबत अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात आगामी काळात पाणीटंचाईचे तीव्र संकट ओढवण्याची चिन्हे स्पष्ट असताना महापालिकेकडून मात्र कोणत्याही उपाययोजना हव्या त्या गतीने सुरु नसल्याचेच स्पष्ट होत आहे. केवळ स्थानिक आमदारांचा निषेध करुन नगरसेवक शांत झाले आहेत. १४ फेब्रुवारीच्या सभेत नगरसेवकांनी पाण्याच्या विषयावर न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. पाच दिवसांत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन पाण्याच्या विषयावर आणखी किती दिवस हातावर हात ठेवून शांत बसणार आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ऐनवेळी पाण्यासाठी शहरवासीयांना फिरायची वेळ येते की काय? असा प्रश्न भेडसावत आहे.
नांदेडसाठी ५५ दलघमी पाणी आरक्षित
गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या जवळपास साडेसहा लाख लोकसंख्येच्या नांदेड शहरासाठी महापालिकेने विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी तर इसापूर प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. त्याचवेळी डिग्रस बंधा-यातूनही १० दलघमी पाणी नांदेडसाठी घेण्यात आले आहे. तब्बल ५५ दलघमी पाणी शहरासाठी आरक्षित असताना पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करायची वेळ दरवर्षी येत आहे. त्यामुळे दरवर्षीच उद्भवणारे राजकीय वादविवाद टाळण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या प्रश्रावर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Web Title: Waiting for Isapur's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.