स्थलांतरास ग्रामस्थांनी वेळ घेतला; साडेतीन तासांत लेंडी प्रकल्पात ८ मीटरने पाणी वाढल्याने घात
By शिवराज बिचेवार | Updated: August 23, 2025 19:37 IST2025-08-23T19:36:13+5:302025-08-23T19:37:59+5:30
लेंडी आंतरराज्यीय प्रकल्प; तीन महिन्यांपूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा

स्थलांतरास ग्रामस्थांनी वेळ घेतला; साडेतीन तासांत लेंडी प्रकल्पात ८ मीटरने पाणी वाढल्याने घात
नांदेड : लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची जोता पातळी ही ३८८ मीटर होती. अनपेक्षित पर्जन्यमान किंवा अतिवृष्टी झाल्यास बुडीत क्षेत्रातील सात गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून, ग्रामस्थांनी तातडीने नव्या गावठाण येथे स्थलांतरित व्हावे, अशा नोटिसा लेंडी प्रकल्प विभागाने मे महिन्यातच ग्रामस्थांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतर संघर्ष समितीकडून स्थलांतरासाठी वेळ मागून घेण्यात आला. त्यात रविवारी रात्री अवघ्या साडेतीन तासांत प्रकल्पाची पाणीपातळी आठ मीटरने वाढल्याने ही गावे पाण्याखाली गेली.
लेंडी प्रकल्पाच्या घळ भरणीचे काम करताना मुख्य नदीपात्रात मातीकाम पूर्णसंचय पातळीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. जोता पातळी ३८८ मीटर असून, पूर्णसंचय पातळी ही ३९६ मीटर आहे. मान्सूनपूर्व काळापासून प्रकल्पाचे १४ वक्रद्वार उघडून ठेवण्यात आले होते. बुडीत क्षेत्रातील गावांच्या सुरक्षिततेसाठी एक सांडवा जोता पातळीच्या ६.५ मीटरने खाली म्हणजे ३८१.५ मीटरवर ठेवण्यात आला होता.
१७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत धरणातील पाणीपातळी ही ३८३.५० मीटर होती. त्यात रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बाऱ्हाळी भागात ३५४.८ मि.मी., रावणकाेळा २२२ मि.मी., मुक्रमाबाद २०६.८ मि.मी., लेंडी धरणस्थळ ९५ मि.मी., वाढोणा ८३ मि.मी. आणि जांब भागात ५४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान ढगफुटी झाली. परिणामी धरण क्षेत्रातील रावणगाव, भिंगोली, भासवाडी, भेंडेगाव खु., वळंकी, भाटापूर, हसनाळ व मारजवाडी या गावांत पाणी शिरले.
१७ ऑगस्टला मध्यरात्री धरणाची पाणीपातळी ३८३.५० मीटर होती. त्यात साडेतीन तासांत अचानक ८ मीटरने वाढ होऊन ती ३९१.५० मीटरपर्यंत गेली होती. प्रकल्पाची एकूण क्षमता ५.१२ टीएमसी असून, अवघ्या दोन तासांत प्रकल्पात ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २.४७ टीएमसीपेक्षा अधिक पाणी आले. परिणामी या पाण्याने बुडीत क्षेत्रातील गावांना आपल्या कवेत घेतले.
१६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसा
लेंडी प्रकल्पाकडून हासनाळ प.मू. येथील ग्रामस्थांना १६ मे रोजी स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यात दगडी धरणाची पाणीपातळी ३८८ मीटर राहणार असून, या पातळीला काही गावे बुडीत होऊन बाधित होणार आहेत. त्यामुळे साहित्य, गुरे-ढोरे घेऊन नवे गावठाण या ठिकाणी दिलेल्या भूखंडावर स्थलांतरित व्हावे, असे त्यात नमूद आहे. परंतु त्यानंतरही ग्रामस्थांनी गाव सोडले नव्हते.