अत्यंत दुःखद! सेवानिवृत्तीला १२ दिवस शिल्लक असतानाच जवानाची प्राणज्योत मालवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:43 IST2025-12-19T13:38:33+5:302025-12-19T13:43:43+5:30
सेवानिवृत्तीला १२ दिवस बाकी असतानाच जवानाची मृत्यूशी झुंज अपयशी

अत्यंत दुःखद! सेवानिवृत्तीला १२ दिवस शिल्लक असतानाच जवानाची प्राणज्योत मालवली
भोकर (नांदेड): १८ वर्षे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एका बहादूर जवानाचा सेवानिवृत्तीचा आनंद साजरा करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भोकर येथील शहीद प्रफुल्लनगरचे रहिवासी असलेले जवान सुधाकर श्रीराम कदम (वय ३७) यांची १९ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण भोकर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच 'काळाचा घाला'
सुधाकर कदम हे २००८ मध्ये ईएमई बटालियन अंतर्गत २ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये 'नायक' पदावर भरती झाले होते. त्यांनी आपल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पंजाब, जम्मू-काश्मीर, आसाम, राजस्थान आणि श्रीनगर यांसारख्या अतिसंवेदनशील भागात देशसेवा बजावली. विशेष म्हणजे, अवघ्या १२ दिवसांनंतर म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी ते निवृत्त होऊन कायमचे घरी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
लोकशाहीचा हक्क बजावला अन् तब्येत बिघडली
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सुधाकर कदम २ डिसेंबर रोजी खास रजेवर गावी आले होते. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जवान सुधाकर कदम यांचे पार्थिव आज (१९ डिसेंबर) सायंकाळी भोकर येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भोकर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगा, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे.