लसीकरण केंद्र ओस पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:46+5:302021-05-27T04:19:46+5:30
बी-बियाण्यांची जुळवाजुळव सुरू मुखेड - खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी हंगामपूर्व शेतीकामे आटोपून बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करीत असल्याचे ...

लसीकरण केंद्र ओस पडले
बी-बियाण्यांची जुळवाजुळव सुरू
मुखेड - खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी हंगामपूर्व शेतीकामे आटोपून बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे. यंदा बियाणे तसेच खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले. काहींनी यावर मात केली. अनेकांनी शेतातील काडीकचरा वेचणे सुरू केले आहे.
पीक कर्जाचे संथगतीने वाटप
लोहा - खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना बँकांकडून पीक कर्ज अद्याप संथगतीने सुरू आहे. मागील वर्षीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नव्हते. यावर्षी तरी बँक प्रशासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे.
आरोग्य केंद्राला अवकळा
नायगाव - बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे. ५० वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली होती. तिला आज जागोजागी तडे गेले आहेत. छत गळत असते. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.
अवैध व्यवसाय जोरात सुरू
किनवट - शहरासह परिसरातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. पत्त्याचे क्लब, मटका, गुटखा, दारू विक्री, अवैध प्रवासी वाहतूक स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडून जुजबी कारवाई केली जाते, नंतर पुन्हा अवैध व्यवसाय सुरू होतात. पोलीस ठाण्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. वर्षभरातून एका जमादाराने पुन्हा किनवट मिळविले. त्याच्यावर वसुलीची जबाबदारी वरिष्ठांनी सोपविल्याची माहिती आहे.
विजेच्या समस्याने त्रस्त
हदगाव - तालुक्यातील लिंगापूर येथील ग्रामस्थ वीजपुरवठ्याच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. मागील १५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून, याकडे संबंधित दुर्लक्ष करीत आहेत. सरासरी चार ते पाच तास वीजपुरवठा दिवसभरात नसतो. आष्टी वीज विरतण कंपनीअंतर्गत या गावात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
चार जुगाऱ्यांना पकडले
लोहा - पानभोसी ते मजरे धर्मपुरी रस्त्यावर जुगार खेळणाऱ्या चौघांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ८ हजार १३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. इरफान शेख, फुरखान शेख, बालाजी स्वामी, आजम शेख, अशी आरोपींची नावे आहेत. २३ मे रोजी सायंकाळी ही कारवाई पोलिसांनी केली. जमादार भुते तपास करीत आहेत.
मुख्य रस्त्यावर घाण पाणी
लोहा - उमरा गावातील मुख्य रस्त्यावर घाण पाणी वाहत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्ते, नाल्यांची सफाई, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने घाण पाणी रस्त्याने बारमाही वाहत असते. गावातील मुख्य रस्त्यातच नालीचे पाणी साचल्यामुळे सर्वत्र चिखल, दुर्गंधी सुटली. गावात एक हातपंप आहे. वीज नसल्यास या हातपंपाचाही उपयोग होत नाही.
नायगावे यांची निवड
नांदेड - सरपंच परिषद संघटनेच्या नांदेड जिल्हा समन्वयकपदी गोपाळचावडी ग्रामपंचायत सदस्य मयुरी नायगावे यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्षा दत्ता काकडे, उपाधयक्ष अनिल गीते, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, महिला अध्यक्षा राणी पाटील यांनी ही निवड केली.
दुचाकीच्या धडकेत महिला ठार
मुखेड - तालुक्यातील येवती येथे दोन दुचाकीच्या धडकेत अनुसयाबाई गोपाळराव सुडके (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली. शेतातील काम आटोपून पंढरी वाघमारे यांच्या दुचाकीवर बसून घराकडे येवती येथे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्याने अनुसयाबाई यांचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक पंढरी वाघमारे यांनाही गंभीर मार लागला.
टरबूज विक्रीसाठी भटकंती
मुखेड - बाजारपेठा बंद असल्याने कमी दराने टरबूज विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पाळा येथील टरबूज उत्पादक उमाकांत उमाटे, बजरंग रीसीगावे, प्रकाश डुमणे, बाबुमिया सय्यद यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे गाड्या बंद असल्याने व्यापारी कुणी येत नाहीत. मार्केट उपलब्ध नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. ५० रुपयाचे टरबूज १० ते २० रुपयांना विकावे लागण्याची वेळ संबंधितांवर आली.
होळकर जयंती घरीच साजरी करा
हदगाव - येत्या ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. समाजबांधवांनी घरीच जयंतीचा कार्यक्रम साजरा करावा, असे आवाहन नगरसेविका रुक्मीणबाई हुलकाणे यांनी केले. समाजबांधवांनी घरावर पिवळे झेंडे लावावेत, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांचे स्वागत करावे, ज्याला शक्य होईल त्यांनी मेंढपाळ बांधवांना मदत करून कोरोना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन हुलकाणे यांनी केले.
साेयाबीनचे दर वाढले
कौठा - कौठा बाजारपेठेत सोयाबीन बियाण्यांचा दर ११० ते ११२ रुपये प्रतिकिलो झाला आहे. डीएपी खत बाजारात उपलब्ध नसून काही शेतकरी सोयाबीन बियाणे खरेदी करीत असले तरी, काही कृषी केंद्र चालक प्रात्यक्षिक करूनच बियाणे विक्री करीत आहेत. कंपनी पैसे घेऊन बियाणे देते, आम्ही विक्री करतो, त्यामुळे सर्व जबाबदारी आमच्यावर का, असा प्रश्न कृषी सेवा चालकांनी केला आहे.