नांदेडमध्ये दोन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 17:17 IST2019-05-30T17:15:30+5:302019-05-30T17:17:40+5:30
या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

नांदेडमध्ये दोन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाने खळबळ
नांदेड : नांदेड शहरात मागील दोन दिवसात दोन मुलांचे अपहरण झाले आहे़ जुन्या नांदेडातून इतवारा येथून एका १० वर्षाच्या तर राजेंद्र नगर येथून एका १५ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे़ या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
शहरातील राजेंद्रनगर येथून दिग्विजय गणेश नारागुडे (वय १५) या मुलाचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केले़ विशेष म्हणजे राजेंद्रनगर येथील त्याच्या घरापासूनच दिग्विजयचे अपहरण करण्यात आले़ त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही़ या प्रकरणी मुलाची आई मंगल नारागुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना जुन्या नांदेडातील इतवारा कुंभार टेकडी भागात घडली़ शेख इबाद (१० वर्ष) हा २८ मे रोजी घरासमोरील रस्त्यावर खेळत होता़ त्यावेळी त्याचे अपहरण करण्यात आले़ त्याचाही शोध घेतला, परंतु तो अद्याप सापडला नाही़ या प्रकरणी रफीक पाशा शेख इब्राहीम यांच्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़