नांदेड जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:17 IST2020-07-15T20:16:43+5:302020-07-15T20:17:55+5:30
२ लाख ६५ हजारांपैकी अवघ्या ६५ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज

नांदेड जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत
नांदेड : खरिपाची जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना अद्यापर्यंत मागणी केलेल्या शेतकऱ्यांनी खरीप पीक कर्ज उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्याला दिलेला लक्षांंक केवळ दिखावाच दिसत आहे़ नोंदणी केलेल्या २ लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी ६५ हजार १३ शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप केले आहे़ तर दोन लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे़
नांदेड जिल्ह्यासाठी २ हजार ५३९ कोटी रूपये कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला आहे़ त्यापैकी सर्वाधिक २ हजार ३१ कोटी रूपयांचा लक्षांक हा खरिपासाठी आहे़ उन्हाळ्यानंतर खरीप पेरण्या होतात़ या दरम्यान, शेतकऱ्यांकडे पैसा नसतो आणि पेरणीसाठी सहज पैसे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासनाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते़ परंतु, हा उद्देश केवळ कागदोपत्रीच ग्राह्य धरला जात असल्याने शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना गुंडळण्याच्या हालचाली सुरू असल्याने सर्वच खासगी बँकांनी यंदा पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे़ त्यातच कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोडमडलेली असताना यंदा शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ६५ हजार १३ शेतकऱ्यांना विविध बँकांनी ३४८ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २५८ कोटी २६ लाख रूपयांचे खरीप पीक कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटप करण्यात आले़ सदर बँकेस १८५ कोटींचे लक्षांक दिलेले असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५५ हजार १२५ शेतकऱ्यांना २५८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले़ लक्षांकापेक्षाही अधिक कर्ज वाटप करून विक्रमी १३९ टक्के वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नावावर नोंदविल्या गेले आहे़
आजपर्यंत जिल्ह्यातील व्यापारी, तसेच खासगी बँकांनी केवळ ३़२२ टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे़ १५५७ कोटी रूपयांचे लक्षांक असताना केवळ ५० कोटी रूपये वाटप केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ग्रामीण बँकेने १३़७६ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करत ५ हजार ७१२ शेतकऱ्यांना ३९ कोटी रूपयांचा कर्ज दिले़ जिल्ह्यातील ग्रामीण बँक, व्यापारी, खासगी बँकांनी आखडता हात घेतलेला असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने महामारीच्या काळात सर्वाधिक पीक कर्ज वाटप करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे़
खाजगी बँकांची चौकशी करण्याची गरज; लक्षांक देऊनही पीक कर्जाचे वाटप नाही
कोरोना महामारीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना खासगी, व्यापारी तसेच ग्रामीण बँकेच्या विविध शाखांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात का ठेवला़ मागणी करूनही पीक कर्ज का वाटप केले जात नाही, यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ बँकांना उद्दिष्ट देवून केवळ बोटावर मोजता येईल एवढेच टक्के पीक कर्ज वाटप होत आहे़ बहुतांश ठिकाणी गाव दत्तक असलेल्या बँकांकडून एकाही शेतकऱ्यास कर्ज दिलेले नाही तर इतर ठिकाणच्या वा शाखेच्या बँका संबंधित शेतकऱ्यांनाा दारात उभे राहू देत नाहीत़ त्यामुळे चालू बाकीदार असूनही कर्ज मिळत नसलेल्या लाखो शेतकऱ्यांना आजही कर्जाच्या प्रतीक्षेत बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
३०० कोटी : कर्ज वाटपाचा मानस
मागील काही काळात बँकेची परिस्थिती चांगली नव्हती़ परंतु, संचालक मंडळाच्या प्रयत्नाने आज बँक चांगल्या परिस्थितीत आहे़ त्यामुळे उद्दिष्टापेक्षाही जास्त पीक कर्ज वाटप करण्यात जिल्हा बँकेला यश येत आहे़ जास्तीत जास्त चालू बाकीदार सभासदांना कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़ येत्या काही दिवसांमध्ये मध्यवर्ती बँकेच्या बँक खातेदार शेतकऱ्यांना ३०० कोटी रूपयांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्याचा बँकेचा मानस आहे़
- डॉ. सुनील कदम,अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक