खून का बदला खून? नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात दोघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

By शिवराज बिचेवार | Updated: February 10, 2025 11:57 IST2025-02-10T11:56:35+5:302025-02-10T11:57:26+5:30

Nanded Gurdwara Firing: ​​​​​​​गोळीबाराने नांदेड हादरले! गोळीबाराच्या या घटनेला पूर्वी याच भागात झालेल्या एका खुनाच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Two injured in firing in Nanded; Police cordon off the area | खून का बदला खून? नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात दोघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

खून का बदला खून? नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात दोघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Nanded Gurdwara Firing:- अनेक दिवसांनंतर नांदेड शहर सोमवारी सकाळी गोळीबाराने हादरले. गुरुद्वारा गेट क्रमांक ६ भागात दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखाराने कारमधील दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर पसार झाला. या गोळीबारातील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेमागे दहशतवादी रिंदा याच्या भावाच्या खून प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पथके पाठविण्यात आली आहेत. 

सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गुरुद्वारा गेट क्रमांक ६ जवळील वाहनतळावर एका चारचाकीत बसलेल्या गुरमितसिंग जगिंदरसिंग सेवादार आणि रवींद्रसिंग दयासिंग राठोड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यातील गुरमितसिंग हा खुनाच्या प्रकरणात १२ दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपीने यावेळी चार ते पाच गोळ्या झाडल्या. तर एका भाविकाच्या चारचाकी वाहनातून एक गोळी आरपार गेली. घटनास्थळावर पोलिसांना गोळ्यांच्या तीन पुंगळ्या सापडल्या. गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाला. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोनि. उदय खंडेराय यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच परिसराची लगेच नाकाबंदी करण्यात आली. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात हल्लेखोर दुचाकीवरून जात असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले. दरम्यान, उपचारादरम्यान यातील रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पथके पाठविली आहेत.

रिंदाच्या भावाच्या खुनातील आरोपी
दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याचा भाऊ सत्येंद्रसिंह उर्फ सत्या याचा २०१५ मध्ये खून झाला होता. या खून प्रकरणात काही जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात गुरमितसिंग सेवादारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यात तुरुंगातून तो ३० दिवसांच्या रजेवर नांदेडात आला होता. त्यानंतर मित्र रविंद्रसिंग याच्यासोबत तो सकाळी गुरुद्वारा परिसरात आलेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

खून का बदला खून?
नांदेडात रिंदा आणि माळी परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे. त्यातून दोन्ही बाजूच्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच रिंदाचा भाऊ सत्यपाल याचाही खून झाला होता. या खुनात शिक्षा भोगत असलेला गुरमितसिंग हा पॅरोलवर नांदेडात आल्यावर त्याच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे खून का बदला खून? असा तर काही प्रकार होता काय? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Two injured in firing in Nanded; Police cordon off the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.