शॉपी चालकाला लुबाडणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:36+5:302021-02-05T06:10:36+5:30
नांदेड - शहरातील श्रीनगर भागात दुचाकीवरुन जाणाऱ्या मोबाईल शॉपी चालकाची सहा लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना ...

शॉपी चालकाला लुबाडणारे दोघे अटकेत
नांदेड - शहरातील श्रीनगर भागात दुचाकीवरुन जाणाऱ्या मोबाईल शॉपी चालकाची सहा लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील दुचाकी आणि चोरीतील रोख ४ लाख २५ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयटीआय चौक भागात मो. माजीद हुसेन अहमद हुसेन यांची मोबाईल शॉपी आहे. दिनांक २१ जानेवारी रोजी रात्री मोबाईल शॉपी बंद करुन ते स्कुटीवरुन घरी जात होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी श्रीनगर भागातील एका औषधाच्या दुकानासमोर आली असता, मागाहून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेमध्ये रोख सहा लाख रुपये होते. मो. माजीद यांनी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे वर्णन यावरुन शोध सुरु केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पाेलीस निरीक्षक पांडुरंग भारती हे पथक घेऊन भगतसिंग रोडवर गेले. तेथे त्यांनी गुरुमुखसिंघ रामगडिया (रा. शिकारघाट) आणि मंजितसिंघ शिरपल्लीवाले (रा. सखोजी नगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराच्या झडतीत चोरीतील ४ लाख २५ हजार ५०० रुपये सापडले तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपींनी विष्णूपुरी येथील नानकसर गुरुद्वारा येथून चोरल्याचे पुढे आले. पुढील तपासासाठी आरोपींना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.