आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:32 IST2019-02-16T00:31:36+5:302019-02-16T00:32:14+5:30
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय होणार असल्याची तक्रार मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी राज्यपालांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय
नांदेड : राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय होणार असल्याची तक्रार मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी राज्यपालांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.
परिवहन महामंडळाने १४ फेब्रुवारी रोजी वाहक, चालक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीपर्यंतच ठेवलेली होती. त्यामुळे या २४ ते ४८ तासांत गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचणार कधी आणि ते अर्ज करणार कधी ? असा प्रश्नही डॉ. बेलखोडे यांनी उपस्थित केला आहे. जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना अर्ज करता यावेत यासाठी ही मुदत वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच आदिवासींसाठी सुरु केलेल्या ‘आदिवासी ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्रा’ चा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. २० वर्षांपूर्वी किनवट येथे सदर केंद्र सुरु करण्यात आले होते.
पुढे हे केंद्र जसेच्या तसे म्हणजे अगदी नावासह नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात आले व कालांतराने ते बंदही पाडले. या प्रशिक्षण केंद्रावर सन २००० मध्ये ५५ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झाले असून, २४३ विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. हे केंद्र बंद पडल्याने प्रतीक्षा यादीही कागदावरच राहिली आहे. सदर प्रशिक्षण केंद्र शासनाने प्राधान्याने किनवट येथे स्थलांतरीत करुन कार्यान्वित करण्याची गरज बेलखोडे यांनी व्यक्त केली. वैधानिक विकास मंडळाच्या मागासवर्गीय कल्याण, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विशेष समितीने २८ जानेवारीच्या बैठकीत सदर प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्याबद्दलचा ठराव घेतला आहे. परिवहन खात्यासोबतच आदिवासी विकास विभागानेही आदिवासी तरुण-तरुणींच्या भवितव्याचा विचार करुन यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही डॉ. बेलखोडे यांनी केली आहे.
परिवहन महामंडळाने १४ फेब्रुवारी रोजी वाहक, चालक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारीपर्यंतच ठेवलेली होती. त्यामुळे या २४ ते ४८ तासांत गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोहोचणार कधी आणि ते अर्ज करणार कधी ? डॉ. अशोक बेलखोडे, किनवट