जिल्ह्यात ८२ विद्यार्थ्यांनाच दिला जातोय प्रवास भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:26+5:302021-04-09T04:18:26+5:30
नांदेड- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनयम- २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. जिल्ह्यातील ८२ ...

जिल्ह्यात ८२ विद्यार्थ्यांनाच दिला जातोय प्रवास भत्ता
नांदेड- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनयम- २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. जिल्ह्यातील ८२ विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार आहे. जवळच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आतशाळा उपलब्ध नाहीत, अशा वस्त्यांमधील ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या हेतूने मोफत परिवहन सुविधा किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कायद्यात तरतूद आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या नियमित प्राथमिक शाळेत जाण्यासाठी एसटीची सोय अथवा मासिक पासची सोय ज्या ठिकाणी उपलब्ध नसेल तेथे अधिकृत खाजगी वाहनांची सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाकडून वाहतुकीसाठी अनुदान प्रत्येक महिन्यासाठी सरासरी खर्च प्रतिविद्यार्थी ३०० रुपयांप्रमाणे दहा महिन्यासाठी तीन हजार रुपयांपर्यंत तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
सर्व जिल्ह्यातील शाळा व वसतिस्थाने यातील अंतराबाबतच्या प्राप्त माहितीच्या विश्लेषणानंतर वाहतूक सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी या वर्षी राज्य शासनाने विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ८२ विद्यार्थ्यांंना याचा लाभ मिळणार आहे.
लाभार्थी विद्यार्थ्यांचे अथवा त्यांच्या पालकांचे विशेषता आईच्या बँक खात्यावर ही रक्कम जिल्हास्तरावर थेट जमा करण्यात येत आहे. आई नसल्यास अथवा तिचे खाते नसल्यास विद्यार्थ्यांच्या जवळच्या अन्य पालकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे निर्देश आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरविली आहे, अशा विद्यार्थ्यांची नोंद आधार क्रमांक, ज्या शाळेमध्ये शिकविले जाते तेथील सरल डाटाबेस संगणक प्रणाली अथवा शालेय पोषण आहार योजनेच्या वेब पोर्टलद्वारे विद्यार्थी उपस्थतीची खातरजमा करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील एकुण कमीत कमी ५० टक्के हजेरी ग्राह्य धरावी, अशा सूचना प्रवास भत्ता मंजूर करण्यासंदर्भात देण्यात आल्या आहेत.
चौकट- जिल्ह्यातील ४७३ दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस भत्ता दिला जातो. २०१९- २० या शैक्षणिक वर्षात ४७३ दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस भत्ता देण्यात आला होता. मात्र २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोनाचे संकट ओढावल्याने शाळा सुरूच झाल्या नाही. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस भत्यापासून वंचित राहावे लागले. पाचवी ते आठवीतील प्रति विद्यार्थ्यास दरमहा ६०० रूपये भत्ता दिला जातो. वर्षभरात १० महिन्याचे ६ हजार रूपये या विद्यार्थ्यांना दिले जातात. मात्र आता निधी उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना हा भत्ता मिळू शकला नाही.
चौकट- कोरोनाचा फटका
राज्य शासनाच्या वतीने विविध योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. कोविड १९ या जागतिक महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे वस्ती स्थानांमधील पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत वाहतूक सुविधा उपक्रमांतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला आहे.
चौकट- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार पात्र विद्यार्थ्यांना वाहतूक अनुदान दिले जाते. त्यानुसार ८२ विद्यार्थ्यांना हे अनुदान मंजूर झाले आहे. सुचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड