कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णुता व एकात्मता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:42+5:302021-02-05T06:10:42+5:30

हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा गौरव - पालकमंत्री अशोक चव्हाण भारतीय ...

Tolerance and unity maintained by the people during the Corona period | कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णुता व एकात्मता

कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णुता व एकात्मता

हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा गौरव

- पालकमंत्री अशोक चव्हाण

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन आपण साजरा करीत असताना मागील 71 वर्षांच्या संचितापेक्षा गत एक वर्षात जे काही अनुभवले, जे काही पाहिले, जे काही सोसले ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मात्र, या कठीण कालावधीत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतीयांनी नागरिक म्हणून जो संयम, धैर्य, सहिष्णुता आणि एकात्मता दाखविली ती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मूल्यांचा गौरव करणारी आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांचा गौरव केला.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. यावेळी महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्वातंत्र्यसैनिक, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी व वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

राज्यघटनेच्या या मूलतत्त्वावर लोककल्याणकारी राज्याची भूमिका आपण स्वीकारून राज्याच्या प्रत्येक भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजनांना आकार दिला आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून विकासासाठी प्रतीक्षेत असलेल्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण प्रशासनाची, विविध विभागांची निर्मिती केली आहे. या सर्व यंत्रणेमार्फत आपण नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांना चालना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टीने आम्ही निर्णय घेतला असून, आता नांदेड ते जालन्यापर्यंतचा साधारणत: 194 कि.मी.चा स्वतंत्र समृद्धी मार्ग केला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रीटचा सहा पदरी असून, याला अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या 1 तासात येणे शक्य होणार आहे. नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासांत नांदेड येथून औरंगाबादला पोहोचता येईल. मुंबईला जाण्याचा प्रवासही यामुळे अवघ्या सात तासांत जलद आणि सुरक्षितरीतीने नांदेडवासीयांना करता येईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामांसह एशियन डेव्हलपमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास 1 हजार 325 कोटींचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.

कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. कोरोनाचे प्रमाण कमी जरी झाले असले तरी त्याचा धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी नीट लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची लस जिल्ह्यातील गरजवंतांपर्यंत पोहोचावी यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत आरोग्य विभागात व कोरोना व्यवस्थापन आणि नियंत्रणासंदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देत आहोत. कोरोनावरची लस ही सक्षम असल्याने आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने लसीकरणासाठी तयार राहावे, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गाव तेथे स्मशानभूमी अभियानांतर्गत

पालकमंत्र्यांच्या हस्ते जमीन प्रदान आदेशाचे वाटप

नांदेड जिल्ह्यातील असंख्य गावांत आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो. स्मशानभूमीची जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात. यात तक्रारी होत असल्याने बऱ्याच वेळा हा प्रश्न जटिल होतो. नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून “गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी” योजना हाती घेतली असून, नांदेड तालुक्यातील चिखली, निळा, भोकर तालुक्यातील जांबदरी, धारजनी, मौ. चिचाळा या गावांना जमीन प्रदान आदेशाचे प्रातिनिधिक वाटपही केले.

याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या शासनस्तरावर तात्काळ पोहोचाव्यात व त्यावर प्रशासनाला काम करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने ‘प्रशासन आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ त्यांनी केला.

ग्रामीण भागासह शहरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचत गटांची भूमिका ही खूप मोलाची आहे. यादृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत वेळोवेळी नावीन्यपूर्ण योजनांसाठी बचत गटांना प्रोत्साहित केले जाते. जिल्ह्यातील बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या नांदेड येथील रमाई महिला बचत गट, करंजी, ता. हिमायतनगर येथील जिजाऊ महिला बचत गट, तेजस्विनी मसाला युनिट नांदेड, नाळेश्वर, ता. नांदेड येथील अष्टविनायक महिला बचत गट यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटरशिप अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर जिल्ह्यात “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानांतर्गत जी साक्षरता मोहीम घेतली आहे त्या मोहिमेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतुक करून पुस्तिकेचे प्रकाशन केले.

Web Title: Tolerance and unity maintained by the people during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.