थरारक ! नांदेडमध्ये पोलिसांच्या गोळीबारात गुंड जखमी; अपहृत मुलाची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 14:50 IST2020-08-08T14:48:47+5:302020-08-08T14:50:30+5:30
आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थरारक ! नांदेडमध्ये पोलिसांच्या गोळीबारात गुंड जखमी; अपहृत मुलाची सुखरूप सुटका
नांदेड : लोहा शहरातून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या मजूर आईला फोनवरून २० लाखांची खंडणी मागणारा अट्टल गुन्हेगार विकास हटकर पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नांदेड शहराच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे़ लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात राहणाऱ्या जमुनाबाई संतोष गिरी यांचा मुलगा शुभम संतोष गिरी (१६) याचे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपहरण केले होते. त्यानंतर जमुनाबाईला २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती़
पैसे दिले नाही तर मुलाला ठार मारून टाकू, अशी धमकी दिल्यानंतर जमुनाबाई यांनी लोहा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ शुभमचे अपहरण करणारा विष्णुपुरी (ता. नांदेड) येथील अट्टल गुन्हेगार विकास हटकर हा असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याच्या मोबाईल सीडीआरवरून तसेच त्याने केलेल्या फोनवरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
अपहरण केलेल्या युवकाला घेऊन तो नांदेडच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात एका घरात दडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचे पथक निळा रस्त्यावर त्यांचा शोध घेत होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच विकास हटकर अपहरण केलेला मुलगा शुभम गिरी या मुलाला घेऊन पुयनी मार्गे पळत सुटला.
यावेळी पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, तो थांबला नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत शेवटी पायावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला आणि जागीच कोसळला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आले़ यावेळी घाबरून गेलेल्या शुभम गिरी या अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याला पोलीस पथकाने धीर दिला. जखमी विकास हटकर याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या ताब्यातून सुटका करून घेतलेल्या मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले़ याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आठवड्यात जिल्ह्यात गोळीबाराची ही दुसरी घटना असून, पहिल्या फायरिंगमध्ये एक कुख्यात गुंड ठार झाला होता.
हटकरवर गंभीर गुन्हे
विकास हटकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाईलवरील संभाषणावरून ओळखले आरोपीला
लोहा येथील मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याची आई जमुनाबाई यांना आरोपीने फोन करून पैशाची मागणी केली होती़ यावेळी तो कॉल रेकॉर्ड करण्यात आला होता़ पोलिसांनी आरोपी विकास हटकर आणि जमुनाबाई यांच्यातील संवाद काळजीपूर्वक ऐकल्यानंतर पैशाची मागणी करणारा फोन विकास हटकर याचा असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर पोलिसांनी विकास हटकर याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेऊन त्याचा माग काढला़