जिल्हयात लाॅकडाऊन काळातील तीन हजारांवर गुन्हे रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:07+5:302021-02-05T06:10:07+5:30

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता ...

Three thousand crimes during the lockdown period will be canceled in the district | जिल्हयात लाॅकडाऊन काळातील तीन हजारांवर गुन्हे रद्द होणार

जिल्हयात लाॅकडाऊन काळातील तीन हजारांवर गुन्हे रद्द होणार

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यातही कोरोनासाठी नियमावलीही कठोर केल्या होत्या. परंतु, या काळातही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते तर ठराविक वेळेनंतरही दुकाने सुरु होती. मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे, विनापरवानगी प्रवास अशाप्रकारे कोरोनाच्या नियमावलींचे भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात या कालावधीत जवळपास तीन हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते. आता राज्य शासनाने हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड शहराशेजारी हिंगोली, परभणी, यवतमाळ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे या सीमावर्ती भागातून नांदेडात प्रवेश करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी पकडून शहरातच क्वारंटाईन केले होते.

गुन्हे परत कसे घेतले जातात?

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रवेश करु नये, यासाठी सीमाभागात तपासणी नाके लावण्यात आले होते. याठिकाणी विनापरवानगी शहरात शिरणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात फिक्स पॉईंट तयार करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. त्यानंतरही अनेक नागरिकांनी नियमांचा भंग केला. काही जणांनी आंदोलनेही केली. पोलिसांशी हुज्जत घालणे यासह कोविडच्या नियमासंदर्भात जिल्ह्यात कलम १३५ आणि १८८नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते. - द्वारकादास चिखलीकर, स्थागुशा पोलीस निरीक्षक.

यापूर्वीही सरकारे बदलली की, राजकीय स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यात येत होते. आता कोविडच्या काळात साथरोग नियमाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने पोलीसच या गुन्ह्यात तक्रारदार असतात. त्यामुळे सरकार एक आदेश काढून हे गुन्हे मागे घेत असल्याचे नमूद करते. त्यानंतर हे सर्व गुन्हे रद्द होतात. जिल्ह्यात कोविडच्या काळात किरकोळ कारणावरुन गुन्हे दाखल झालेल्यांना त्यामुळे दिलासा मिळेल.

विनापरवानगी प्रवासाचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

कोरोना काळात प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही अनेकजण विनापरवानगी प्रवास करत होते. अशा नागरिकांना सीमेवरच अडविण्यात आले होते. काहीजण मात्र पोलिसांची नजर चुकवून प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. परंतु, त्यांना शहरात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये विनापरवानगी प्रवासाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर जमावबंदी आदेश, ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडी ठेवणे, विनामास्क फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या कारणामुळे पोलिसांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार घडले आहेत.

Web Title: Three thousand crimes during the lockdown period will be canceled in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.