बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी आणखी तीन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:15 IST2020-07-16T17:12:44+5:302020-07-16T17:15:22+5:30
नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे वाण जेएस-३३५, जानकी-८८ जातीचे निकृष्ट बियाणे विक्री करुन फसवणूक

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी आणखी तीन गुन्हे दाखल
नांदेड : शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री तीन कंपन्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले़
नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाण जेएस-३३५, जानकी-८८ जातीचे निकृष्ट बियाणे विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी कृषी अधिकारी डॉ़राहुल राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात जानकी सिड्स अॅन्ड रिसर्च म्हेसपूर (ता़ अकोला) या कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हदगाव तालुक्यात मे़किसान अॅग्रो टेक्नालॉजी इंडिया प्रा़लि़ माणिकनगर (ता़ सिल्लोड) या कंपनीचे सोयाबीन बियाणांचे उगवणक्षमता कमी असताना त्याची विक्री करण्यात आली़
याप्रकरणी कृषी अधिकारी प्रल्हाद महादू जाधव यांच्या तक्रारीवरुन मे़किसान अॅग्रो टेक्नॉलॉजी प्रा़लि़ व तसवर बेग युसूफ बेग मिर्झा याच्याविरोधात हदगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ हिमायतनगर तालुक्यातही अशाचप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली़ उत्तम सिड्स टिचर्स कॉलनी, खांडवा मध्यप्रदेश या कंपनीने सोयाबीन बियाणांचा पुरवठा केला होता़ हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध दुकानातून या कंपनीच्या सोयाबीनची खरेदी केली होती; परंतु त्याची उगवण झाली नाही़ याप्रकरणी कृषी अधिकारी पुंडलिक माने यांच्या तक्रारीवरुन उत्तम सीड्स कंपनीविरोधात गुन्हा नोंदविला आहे़