चोरट्यांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे; शेतकऱ्याचे बाईकसह दागिने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:15 IST2021-07-17T17:14:41+5:302021-07-17T17:15:29+5:30
सोन्याचांदीचे दागिने व एक मोटार सायकल असा ३ लाख १० हजार ५०० रूपयांचा एवज लंपास केला.

चोरट्यांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे; शेतकऱ्याचे बाईकसह दागिने केले लंपास
अर्धापूर : - तालुक्यातील सांगवी (बु) येथील एका शेतकऱ्याच्या घरातून शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने व एक मोटार सायकल असा ३ लाख १० हजार ५०० रूपयांचा एवज लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अर्धापूर पोलीस ठाण्यापासुन १८ किमीवर असलेल्या सांगवी (बु) येथील शेतकरी सदाशिव मुळे यांच्या घरात शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील पेटीचे कुलूप तोडून सोन्याचादींचे दागिने लंपास केले. तसेच मोटार सायकल ( एम.एच.२६-बी.एन.३२४५ ) सुद्धा पळवली. असा ३ लाख १० हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. चोरट्यांनी सोयाबीनच्या शेतात संदुक, पेट्या फेकून दिल्या. तसेच किशन हरीराम मुळे यांच्या घरातील चांदीचे दंडकडे तर परसराम नामदेव मुळे यांचे ५ हजाराची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक जाधव,उपनिरक्षक साईनाथ सुरवशे, फौजदार कपिल आगलावे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सदाशिव शंकर मुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे हे करत आहेत.
ग्रामस्थांनी दागिने, रोख रक्कम घरी ठेवतांना खबरदारी घ्यावी. युवकांनी गावपातळीवर सुरक्षा दलाची स्थापना करून चोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करावी.
- अशोक जाधव, पोलीस निरीक्षक अर्धापूर