नांदेड जिल्ह्यात नामांकित रुग्णालयाची महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:43 IST2017-12-28T18:41:40+5:302017-12-28T18:43:09+5:30
गेल्या २१ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २० हजार ५६ रुग्णांना नामांकित रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत़ परंतु आजही अनेक नामवंत खाजगी रुग्णालये या योजनेत समावेशासाठी उदासीनच असल्याचे दिसत आहे़

नांदेड जिल्ह्यात नामांकित रुग्णालयाची महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे पाठ
- शिवराज बिचेवार
नांदेड : गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेअंतर्गत गेल्या २१ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २० हजार ५६ रुग्णांना नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत़ परंतु आजही अनेक नामवंत खाजगी रुग्णालये या योजनेत समावेशासाठी उदासीनच असल्याचे दिसत आहे़
गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि उपचारासाठी त्यांची वाताहत थांबावी यासाठी शासनाने २०१२ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली़ त्यामध्ये पिवळे, केशरी, अंत्योदय आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दीड लाखांपर्यंत आरोग्य सुविधा मिळते़ या योजनेअंतर्गत ९७१ गंभीर आजारांवर उपचार केले जातात़ राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या योजनेचे नावही बदलण्यात आले़ आता महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना म्हणून राज्यभर ती राबविण्यात येत आहे़ आजघडीला या योजनेत जिल्ह्यातील १० रुग्णालयांचा समावेश आहे़ त्यामध्ये एप्रिल २०१६ ते १० डिसेंबर २०१७ या कालावधीत एकूण २० हजार ५६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत़ त्यात आधार हॉस्पिटलमध्ये ३४००, अपेक्षा क्रिटीकल केअर सेंटर-१३९१, लोटस् हॉस्पिटल-२८२३, नंदीग्राम हॉस्पिटल-९८४, नांदेड मेडिकल फाऊंडेशनचे कॅन्सर हॉस्पिटल-२१७७, संजीवनी क्रिटीकल केअर-१५९३, उपजिल्हा रुग्णालय मुखेड-४, डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय-२२२०, विनायक हॉस्पिटल-४४४७ तर लव्हेकर हॉस्पिटलमध्ये ७६४ रुग्णांवर जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत.
या रुग्णांवरील उपचारासाठी शासनाकडून या दहा रुग्णालयांसाठी एकूण ४२ कोटी ६० लाख २ हजार ३४८ रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे़ त्यात ३७१ रुग्णांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असून १५७३ जणांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत़ या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नामांकित रुग्णालयात उपचार मिळावे असा उदात्त हेतू असला तरी, अद्यापही शहर व जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालये या योजनेत सहभागाबाबत उदासीनच असल्याचे दिसत आहे़
जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचा मानस
महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात कक्ष सुरु करण्यात आला आहे़ या ठिकाणी रुग्णांना योजनेची माहिती देवून त्यांना मदत केली जाते़ तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतात, अशी माहिती योजनेचे समन्वयक डॉ़ विलास सर्जे यांनी दिली़