दहावीत विद्यार्थी होणार नाही नापास; विद्यार्थ्यांसह पालकांतून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:25+5:302021-02-05T06:09:25+5:30
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने दिलासादायक नियम आणला आहे. त्यात विविध ऐच्छिक विषय देण्यात ...

दहावीत विद्यार्थी होणार नाही नापास; विद्यार्थ्यांसह पालकांतून स्वागत
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने दिलासादायक नियम आणला आहे. त्यात विविध ऐच्छिक विषय देण्यात आले आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह सब्जेक्टस’ या नियमाच्या आधारावर ठरवली जाईल. म्हणजेच सीबीएससीच्या परीक्षेत कुणीच नापास होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. बोर्डाकडून हा नियम विशेषत: अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे. जे विद्यार्थी हुशार आहेत. परंतु अभ्यासात थोडे कच्चे आहेत. भारत सरकारचे स्किल इंडिया इनिशिएटिव्हसुद्धा समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएससीने निश्चित केलेल्या कौशल्याधारित विद्यार्थ्यांचा रस वाढतो आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
चौकट
विद्यार्थ्यांना पाच विषय अनिवार्य असतात. तसेच ऐच्छिकमध्ये कौशल्याधारित विषय निवडण्याची संधी आहे. त्यामुळे या विषयात नापास होण्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी पाचपैकी एखाद्या विषयात नापास झालेल्या विद्यार्थीदेखील उत्तीर्ण घोषित केले जाणार आहे. या निर्णयाचे सर्वांकडूनच स्वागत होत आहे. - सुनील श्रीवास्तव, किड्स किंगड्म, नांदेड.
विद्यार्थ्यांना ऐच्छिक आणि आवडीचा विषय निवडण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेत आवड असलेल्या विषयाचे नॉलेज शालेयस्तरावर मिळत आहे. भविष्यात करिअर करताना याचा निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. - प्रवीण सेलमोकर, पालक
सीबीएससीमध्ये ऐच्छिक विषय देऊन एकप्रकारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचे काम या शिक्षणातून होणार आहे. ऐच्छिक विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असल्यामुळे ते आवडीचा विषय निवडून त्यात यश संपादन करतील. परंतु, या विषयाचे सखोल मार्गदर्शन शाळेतून मिळायला हवे. - सुनीता मिरटकर, पालक
शालेयस्तरावर प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यावहारिक आणि कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार सीबीएससीमध्ये ऐच्छिक विषय घेऊन आपल्याला आवडणाऱ्या विषयाचे ज्ञान मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. - विकास धोंडगे, पालक