वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:43 PM2022-06-18T15:43:19+5:302022-06-18T15:43:46+5:30

हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याने कारवाई

suspended 5 agencies taking wrong readings of electricity meters | वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ

वीज ग्राहकांचा मनःस्ताप थांबणार; मीटरची चुकीची रीडिंग घेणाऱ्या ५ एजन्सी बडतर्फ

Next

नांदेड : लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापर प्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरूवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडळातील १० उपविभागात काम करणाऱ्या पाच एजन्सीचा समावेश आहे.

१०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रीडिंग एजन्सीचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे ताबडतोब आढावा बैठक घेतली. ‘ कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीज बिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीज विरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते. 

गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रीडिंगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील किनवट येथील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था तसेच लोहा येथील साईबाबा पुरूष बचतगट, कंधार येथील राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान तर बसमत येथील प्रगती स्वयंरोजगार या एजन्सींना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच परभणी,पाथरी, गंगाखेड, मानवत, पालम, सोनपेठ याठिकाणी कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

ग्राहकांना रीडिंगनुसार वीज वापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीज विक्रीमध्ये १९९ दशलक्ष युनिटने म्हणजेच १४० कोटी रुपयांनी महावितरणच्या महसूलात वाढ झाली आहे.

Web Title: suspended 5 agencies taking wrong readings of electricity meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.