नवीन नांदेड परिसरात तरुणाची नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:41 IST2018-11-19T15:39:37+5:302018-11-19T15:41:04+5:30
नैराश्यातून एका २४ वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

नवीन नांदेड परिसरात तरुणाची नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या
नवीन नांदेड : नैराश्यातून एका २४ वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी आठ वाजेदरम्यान तुप्पा शिवारात निदर्शनास आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील तुप्पा पाटीजवळील शेतकरी कादरी यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान, एक तरूण कापडी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केला असल्याची माहिती तुप्पा येथील पोलिस पाटील शेख आजमोद्दीन यांना समजली. दरम्यान, शेख आजमोद्दीन यांनी उपरोल्लेखित घटनेची माहिती नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीसांना दिली.
ही माहिती समजताच महिला पोउपनि. स्वाती कावळे, पोउपनि. सोनाली कदम, पो. हे. कॉ. रमाकांत कदम व पो. काॅ. तानाजी ठाकुर यांनी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी, पोलिसांना घटनास्थळी असलेल्या एका दगडावर चुण्याने लिहीलेला मोबाइल क्रमांक निदर्शनास आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दगडावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो मयत तरुणाच्या मुंबईस्थित भावाचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या प्रेताची ओळख पटली असून, मयत तरुणाचे नाव यादव जयसिंग सोनकांबळे (रा. मंग्याळ, ता. मुखेड) असे असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार संजय रामदिनेवार यांनी दिली. उपरोल्लेखित पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ पंचनामा करून यादव सोनकांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात हलविले.