Strong fielding of BJP aspirants on the backdrop of the Mahajandesh Yatra in Nanded | नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपा इच्छुकांची जोरदार फिल्डींग
नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपा इच्छुकांची जोरदार फिल्डींग

ठळक मुद्देयात्रेतून मुखेड मतदारसंघ वगळल्याने आश्चर्य इच्छुकांना ग्रीन सिग्नल मिळण्याची अपेक्षा

नांदेड : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाला दमदार यश मिळाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्यातच ऐेन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नांदेडमध्ये मुक्कामी येत असल्याने इच्छुक उमेदवार चांगलेच सक्रिय झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपाच्या ताब्यात असलेला जिल्ह्यातील एकमेव मुखेड मतदारसंघ या यात्रेतून वगळल्याने कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांतूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजयी गुलाल उधळल्यानंतर अनेकांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे.  मागील काही महिन्यांपासून वैयक्तिक पातळीवर गाठीभेटी घेत आपलीच उमेदवारी निश्चित होणार असल्याचा विश्वासही कार्यकर्त्यांना दिला जात आहे. लोकसभेतील विजयानंतर विधानसभेतही भाजपाची सरसी होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांत असल्याने इच्छुकांचे पीक फोफावले आहे. त्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये मुक्कामी येत आहे. 

२५ आॅगस्ट रोजी या यात्रेचे बीड येथून मराठवाड्यात आगमन होणार आहे. त्यानंतर २९ आॅगस्ट रोजी अर्धापूर मार्गे यात्रा नांदेड जिल्ह्यात येणार आहे. अर्धापूरमध्ये दुपारी ४ वाजता यात्रेचे आगमन झाल्यानंतर स्वागत कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लगेच ही यात्रा नांदेडकडे रवाना होईल. नांदेड शहरातील नवामोंढा मैदानावर सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री नांदेड येथे मुक्कामी राहणार आहेत. ३० आॅगस्ट रोजी ही महाजनादेश यात्रा नांदेडहून निघणार असून जानापुरी-लोहा- माळाकोळीमार्गे लातूर जिल्ह्यात मार्गस्थ होईल. 
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने नांदेडवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याचा फायदाही लोकसभेमध्ये पक्षाला झाला. तीच रणनीती विधानसभा निवडणुकांतही आखण्याचे डावपेच भाजपाकडून होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे मागील काही काळात नांदेडकडे विशेष लक्ष राहिलेले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराची निवड करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याबरोबरच पक्षाची तिकिटे जाहीर झाल्यानंतर इच्छुकांतून बंड होऊ नये याची खबरदारीही घ्यावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमधील मुख्यमंत्र्यांचा मुक्कामी दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

‘त्या’ रात्री इच्छुकांना ग्रीन सिग्नल मिळण्याची अपेक्षा
शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढणार की स्वतंत्रपणे हा मोठा प्रश्न  पक्षश्रेष्ठींच्या खुलाशानंतरही सर्वसामान्य कार्यकर्त्यांत कायम आहे. असे असतानाही अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावल्याचे दिसून येते. मागील काही दिवसांत इच्छुक उमेदवारांचे बॅनरही शहरभर दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे नांदेडमध्ये मुक्कामी येणे महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेडमधील या मुक्कामातच मुख्यमंत्री काहींना विधानसभेच्या तयारीसाठी ग्रीन सिग्नल देवून कामाला लावतील, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

मुखेडमध्ये कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा
जिल्ह्यात नऊ मतदारसंघ आहेत. यातील एकमेव मुखेड विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये मुक्कामी येत आहे. मात्र ही यात्रा भोकर, नांदेड उत्तर, लोहा विधानसभा मतदारसंघातून जात आहे. परंतु हक्काच्या मुखेड मतदारसंघात ही यात्रा जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदारसंघातील विद्यमान कारभाराबाबत सोशल मीडियातून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असल्याने तर मुख्यमंत्र्यांनी मुखेडकडे पाठ वळविली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

Web Title: Strong fielding of BJP aspirants on the backdrop of the Mahajandesh Yatra in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.