पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:17 AM2021-01-22T04:17:17+5:302021-01-22T04:17:17+5:30

प्रवासी गाड्या सुरू करा नांदेड, अनलॉक प्रक्रियेमध्ये जवळपास सर्वच मार्गावरील एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु, आजपर्यंत पॅसेंजर गाड्या ...

Strip news | पट्ट्यातील बातम्या

पट्ट्यातील बातम्या

Next

प्रवासी गाड्या सुरू करा

नांदेड, अनलॉक प्रक्रियेमध्ये जवळपास सर्वच मार्गावरील एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु, आजपर्यंत पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करू दिला जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची फरफट होत आहे. तसेच अचानक बाहेर गावी जायचे झाल्यास आरक्षण मिळत नाही. परिणामी स्वतंत्र खासगी वाहन घेऊन जावे लागत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पाण्याचा प्रश्न सोडवा

नांदेड, शहरालगत असलेल्या इंदिरानगर, नई आबादी, सिंधूताई नगर आदी परिसरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. या भागात नळयोजना असूनही अनेकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्या भागात नळाला उच्च दाबाने पाणीपुरवठा येत नाही. तेथील अडचणी दूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

बांधकाम साहित्य रस्त्यावर

नांदेड, बाबानगर परिसरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जात असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात जवळपास १२ ठिकाणी बांधकाम सुरू असून प्रत्येकाने रस्त्यावर गिट्टी, वाळू, विटा टाकल्याने रस्ता ब्लॉक होत आहे.

उघड्या डीपीचा धोका

नांदेड, वसंतनगर, बाबानगर येथील जवळपास सर्वच डीपी उघड्या असून त्यावर झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.आनंदनगर, बाबानगर, हर्षनगर या परिसरात बहुतांश ठिकाणी विद्यार्थी राहत असून त्यांचीच वर्दळ अधिक असते. या बाबीचा विचार करून सर्व डीपीवर झाकण बसविण्याची मागणी होत आहे.

अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

नांदेड, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या राज कॉर्नर ते शिवाजीनगर, वजिराबाद या रस्त्यावर ठिकठिकाणी फूटपाथवर अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी केवळ नावापुरती मोहीम राबविण्यात येते. पुन्हा अर्थपूर्ण संबंधातून फूटपाथवर दुकाने थाटली जातात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो.

चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

नांदेड, शहरातील प्रमुख चौकांमध्ये वेगवेगळे पुतळे बसविण्यात आले आहेत तसेच काही ठिकाणी शोभेच्या वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. परंतु, या चौकांच्या सुशोभीकरणानंतर स्वच्छतेकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शहराचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे. शेतकरी पुतळा, मोर पुतळा आदी ठिकाणी पोस्टर्स चिटकविल्याने चौकाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे.

नाल्या स्वच्छतेची मागणी

नांदेड, विष्णुनगर, हमालपुरा परिसरातील अंतर्गत नाल्या अनेक दिवसांपासून उपसल्या नाहीत. त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत आहे. या परिसरातील मुख्य नाल्यांसह अंतर्गत नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी

नांदेड, नांदेड ते मरळक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मरळक टी पाईंटते मरळक या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे. मरळक येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता रस्ता तत्काळ करणे गरजेचे आहे.

पिकांचे नुकसान

नांदेड, थंडीत वाढ झाली असली तर पहाटेच्या वेळी धुई पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. धुक्यामुळे शेवग्याच्या शेंगा गळून पडत आहेत. त्याचबरोबर मिरची, इतर भाजीपाला आणि पिकांनाही धुक्याचा फटका बसत आहे. परंतु, काही शेतकरी धुक्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करत आहेत.

Web Title: Strip news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.