शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप योजनेचे कार्य प्रगतिपथावर आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५११ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त भोकर तालुक्यातील डोर्ला या गावचे शेतकरी मारुती कोंडिबा देवतुले, बिलोली तालुक्यातील गुजरी येथील रुक्मीणबाई मारुती चेंदे, नायगाव तालुक्यातील देगाव येथील संजय माधवराव गायकवाड, हदगाव तालुक्यातील पिंगळीचे निशिकांत पांडुरंग कोल्हे आणि अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील रावसाहेब किशनराव इंगोले या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कोटेशन सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी नांदेड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, ग्रामीण विभागाचे कार्यकारी आर.पी. चव्हाण, प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशासन एन.व्ही. मारलेगावकर, कनिष्ठ अभियंता एस.डी. जोशी उपस्थित होते.