कामगारांचा मेळावा
नांदेड- महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन व रिपब्लिकन एम्पलॉईज फेडरेशन संलग्नीत कामगार, कर्मचार्यांचा मेळावा १८ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित केला आहे.या वेळी उद्घाटक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, आत्माराम साखरे, विजय सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मास्कचा पडला विसर
नांदेड- कोरोनाचे रूग्ण कमी होत असल्याने व लसीकरणाला सुरूवात झाल्यामुळे नागरिकांनी मास्क वापरण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.कोरोनाचे रूग्ण वाढत असताना अत्यावश्यक असलेले मास्क आता दुर्लक्षीत केले जात आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करणेही कमी झाले आहे.शासनाकडून लसीकरण होणार असले तरी मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
आठवडी बाजारात कचर्याचे ढिगारे
नांदेड- शहरातील आठवडी बाजारात साफसफाई अभावी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या भाजीपाला विक्रेते व ग्राहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.महापालिका प्रशासनाने आठवडी बाजाराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धनेगाव येथे मिरजकर यांचे व्याख्यान
नांदेड- धनेगाव सुनीलनगर येथे अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स व बहुजन मजूर कामगार आघाडीच्यावतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ, मुक्ता साळवे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केल असून त्या निमित्त निवेदिका राजश्री मिरजकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
मथु सावंत यांना पुरस्कार
नांदेड- येथील शिवगर्जना प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा राजमाता जिजाऊ कर्तृत्ववान महिला सन्मान २०२१ या वर्षी साहित्यिका प्रा. डॉ. मथू सावंत यांनी प्रदान करण्यात आला.यावेळी महापौर मोहिनी येवनकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पाटील मोरे यांची उपस्थित हाेते.