अठरा रोप-वेसह सात हायवा, दोन जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:52+5:302021-05-28T04:14:52+5:30
नांदेड़ तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील अनेक गावांतून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मार्कंड, पिंपळगाव, भनगी, गंगाबेटसह आदी गाव ...

अठरा रोप-वेसह सात हायवा, दोन जेसीबी जप्त
नांदेड़ तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील अनेक गावांतून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. मार्कंड, पिंपळगाव, भनगी, गंगाबेटसह आदी गाव शिवारातून नदी घाटावरून दररोज लाखो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. गेल्या दीड़ ते दोन महिन्यांपासून उघडपणे हा प्रकार सुरू होता. बड्या राजकीय वरदहस्त आणि महसूल विभागातील झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे कुणीही कारवाई करत नव्हते. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर कुठलीही माहिती न देता गुरुवारी आपल्या वाहनाने निघाले. गोदावरी नदीतून एका बोटीतूनही पथक रवाना करण्यात आले. घाटावर खडतर रस्ता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरून आणि पायीही प्रवास केला. झाडाझुड़पात लपवून ठेवलेल्या जेसीबीही जिल्हाधिकाऱ्यांनी शोधून काढला. मार्कंड येथे बोटीतून वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून २ जेसीबी जप्त करण्यात आले. गंगाबेट येथे नदीत टाकलेले तब्बल १८ रोप-वे आणि मशीन्स जप्त करण्यात आल्या, तर ७ हायवा गाड्याही जप्त करण्यात आल्या. जिल्हाधिका-यांच्या या धड़क कारवाईमुळे सैराट झालेले वाळू माफिया भानावर येण्याची शक्यता आहे.
चौकट - अवैध रेतीसाठ्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्या शेतजमिनी तसेच मनपा, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी अवैध रेतीसाठे आढळल्यास अशा साठ्यांची माहिती संबंधित कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडल अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. जप्त रेतीसाठ्याच्या लिलावाच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. लिलाव झालेला नसताना कोणी शेतीमध्ये अथवा नदीपात्रालगत अवैध रेतीसाठा करीत असेल, तर त्याच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या रेतीबाबत पथके गठित करून तपासणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.