क्रेडीट कार्डच्या समस्या बनावट कस्टमर केअरला सांगितल्या;शिक्षकाला दीड लाखांचा बसला फटका
By शिवराज बिचेवार | Updated: September 23, 2022 17:02 IST2022-09-23T17:01:59+5:302022-09-23T17:02:55+5:30
गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात

क्रेडीट कार्डच्या समस्या बनावट कस्टमर केअरला सांगितल्या;शिक्षकाला दीड लाखांचा बसला फटका
नांदेड- जिल्ह्यात ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत सायबर सेलकडून जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु त्यानंतरही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे एका शिक्षकाला कस्टमर केअरला फोन लावणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातील १ लाख ४२ हजार रुपये लंपास केले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली.
रमेश भानूदास आंधळे हे मौजे चिखली बु. येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. त्यांनी मोबाईलवरुन गुगलवर एसबीआय बँकेच्या क्रेडीट कार्ड कस्टमर केअरचा क्रमांक शोधला. त्यानंतर त्या क्रमांकावर कॉल केला. समोरील व्यक्तीला त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. समोरील व्यक्तीने समस्या सोडविण्यासाठी एसबीआय क्विक सपोर्ट हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार आंधळे यांनी ॲप डाऊनलोड केला. त्याचा आयडी क्रमांक विचारुन त्यांचा क्रमांक हँग केला. त्यानंतर आंधळे यांच्या एसबीआयच्या क्रेडीट कार्डमधून ९२ हजार ११५ रुपये आणि बचत खात्यातून ५० हजार रुपये अशा एकुण १ लाख ४२ हजार रुपयांवर डल्ला मारला. ही बाब आंधळे यांना कळाल्यानंतर त्यांनी किनवट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास पोहेकॉ.कल्लाळे हे करीत आहेत.