धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:49+5:302021-05-17T04:15:49+5:30
नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ...

धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपला
नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी वाचताना मनाला पटत नव्हते. खूप जड अंतःकरणाने शेवटी ते मान्य करावे लागले. धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपल्याने मराठवाड्यासह महाराष्ट्राचे नुकसान झाल्याच्या भावना माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत. राजीवजींच्या निधनाने एका उमदा तरुण, अभ्यासू खासदार, शांत, संयमी, निगर्वी, प्रसन्न मुद्रेचा युवा नेता आपण गमावला आहे. खूप अल्प कालावधीत राजीव सातव यांनी जिल्हा परिषद ते देशाचे सर्वोच्च सभागृह संसद, ते वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेपर्यंत उत्तुंग भरारी घेतली होती. अभ्यासपूर्ण व प्रभावी शब्दात त्यांनी मराठवाडा, महाराष्ट्रासह देशाचे प्रश्न लोकसभेत आणि राज्यसभेत मांडले. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून ते सत्ताधाऱ्यांनाही अंतर्मुख करत असत. सभागृहात लक्षणीय उपस्थिती दर्शविणारे तरूण खासदार राजीव सातव हे चारवेळा संसदरत्न राहिले होते. अमोघ वक्तृत्व, उत्तम संघटन कौशल्य असणारे राजीव सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले. काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचवला. प्रचंड अभ्यासू असणारे राजीवजी वाचनात खूप रमत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर दांडगा अभ्यास असणारे राजीवजी अनेक चर्चेत पक्षाची भूमिका अतिशय कणखरपणे मांडत होते. अगदी कमी वयात काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात ते सक्रिय झाले होते. युपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. खूप कमी वयात गांधी परिवाराची मर्जी संपादन करणारे राजीव सातव हे केवळ मराठवाडयाचेच नाही, तर महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचा युवा चेहरा होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे अपरिमित नुकसान झाले आहे. जीवनातील अनेक बऱ्यावाईट प्रसंगाला सामोरे जात ते इथपर्यंत पोहोचले होते. जणू,
‘वक्त से पहले हादसो से लडा हू,
लोग कहते है मुझे,
मैं अपनी उम्र से कई साल बडा हू’
असे म्हणणारे राजीवजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या कार्याने, त्यांच्या कामाने ते कायमच लोकांच्या आठवणीत राहतील, अशा शब्दात डी. पी. सावंत यांनी भावना व्यक्त केल्या.