शेतकऱ्याच्या खून प्रकरणातील वाळू माफिया अखेर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:07 IST2020-02-20T20:06:18+5:302020-02-20T20:07:04+5:30
गुरुवारी पहाटे पोलीस पथकाने ठोकल्या बेड्या

शेतकऱ्याच्या खून प्रकरणातील वाळू माफिया अखेर अटकेत
हदगाव (जि़नांदेड) : ऊंचाडा येथील तरुण शेतकऱ्याचा वाळू माफियाने वाळू वाहतुकीसाठी खोळंबा होत असल्याने खून केल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या प्रकरणातील आरोपीला तीन दिवसानंतर पकडण्यात मनाठा पोलिसांना यश आले आहे.
शिवाजी धोंडबाराव कदम या शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसाला पाणी पाळी दिल्याने रस्त्यामध्ये चिखल झाला होता़ यावर आरोपीने रस्ता का खराब करतोस, तुझ्यामुळे वाळू वाहतूक खोळंबत आहे म्हणत भांडण केले़ याचे पर्यावसन संबंधित शेतकऱ्याच्या खुनात झाले़ वाळूच्या धक्क्यापोटी दिवसाकाठी तीन हजार रुपये आरोपीला मिळतात़ मात्र वाहतूक होत नसल्याने आर्थिक नुकसानीच्या रागातून त्र्यंबक प्रभाकर चव्हाण व रामदास प्रभाकर या बंधुनी शिवाजीचा खून केला होता़ या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमळे सहा तासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकरी बी़एस़मुदीराज यांनी आरोपीला २४ तासात पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी अंत्यविधी केला़ मात्र आरोपी सापडत नव्हता़ अखेर गुरुवारी पहाटे सोनी राजेंद्र मुंढे व त्यांच्या टिमने रामदास प्रभाकर चव्हाण यास बेडया ठाकल्या.