भोपळा पिकावर फिरविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST2021-05-26T04:19:04+5:302021-05-26T04:19:04+5:30

पार्डी : लॉकडाऊनमुळे शेतीवर तर परिणाम तर झालाच; शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाल्याने मालाच्या दरात घसरण झाली. काही मालाची निर्यात ...

Rotavator rotated on pumpkin crop | भोपळा पिकावर फिरविला रोटाव्हेटर

भोपळा पिकावर फिरविला रोटाव्हेटर

पार्डी : लॉकडाऊनमुळे शेतीवर तर परिणाम तर झालाच; शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाल्याने मालाच्या दरात घसरण झाली. काही मालाची निर्यात थांबली, अशीच काहीशी अवस्था भोपळा पिकाची झाली असून, मागणी नसल्याने अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रावरील भोपळ्यावर रोटाव्हेटर फिरविला आहे.

शेतकरी जनार्दन देशमुख यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भोपळ्याची लागवड केली होती. ७० ते ९० दिवसांचे पीक असल्याने लवकर पीक घेऊन त्या जमिनीवर खरीप हंगामातील पिकाची लागवड करता येईल, अशी अपेक्षा बाळगून त्यांनी भोपळा लावला. मात्र २५ मार्चपासून लॉकडाऊनमुळे शेतीमालाची खरेदी-विक्री बंद झाल्याने मागणी घटल्याने दीड एकरात लावलेल्या भोपळा पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे.

दीड एकरात भोपळा लावण्यात आला होता, त्यात एक एकरात २० टन उत्पादन निघाले. एका फळाचे वजन सात ते नऊ किलो भरले होते, भोपळ्याला बाजारपेठ मिळाली असती तर दीड ते दोन लाख रुपये हाती आले असते. मात्र कोरोनामुळे उत्पन्न तर सोडा; साधा खर्चही निघाला नाही. पिकासाठी २५ ते ३० हजारांचा केलेला खर्च वाया गेला. भोपळ्याला हैदराबाद, आग्रा, दिल्ली, नागपूर, पुणे, आदी मोठ्या शहरात मागणी असते ; परंतु हीच शहरे लॉकडाऊनमध्ये बंद असल्याने भोपळा पिकाला मागणीच नाही.

प्रतिक्रिया

शेतात नवीन प्रयोग करून नगदी पीक म्हणून भोपळा फळाची शेती केली; परंतु ऐनवेळी कोरोनामुळे बाजारात फळाची मागणीच नाही आणि आता खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी भोपळ्यावर रोटाव्हेटर फिरवून खरीप पिकासाठी जमीन भुसभुशीत केली‌.

- जनार्दन देशमुख, भोपळा उत्पादक शेतकरी, पार्डी

Web Title: Rotavator rotated on pumpkin crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.