धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले
By शिवराज बिचेवार | Updated: December 23, 2024 15:48 IST2024-12-23T15:46:07+5:302024-12-23T15:48:43+5:30
मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल.

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले
नांदेड: वाल्मिक कराड हा माफीया आहे. मस्साजोग प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील सत्य परिस्थिती सांगितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी टाईमपास केला. माफीयाला ताकद देण्याचे काम केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले हे सोमवारी नांदेड विमानतळावर आले होते. यावेळी पटोले म्हणाले, अजित पवारांवर ज्यावेळी आरोप झाले. त्यावेळी त्यांनाही मंत्री मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. आता मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. असे पटोले म्हणाले. तसेच छगन भूजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊ शकतात. त्यावर मी काय बोलणार? त्यांच्या नाराजीबद्दल मला माहिती नाही. मंत्री पदाचे वाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे. कारण हे लोकातून निवडून आलेले सरकार नाही. निवडणुक आयोग आणि भाजपाच्या सिंडीकेट मधून आलेले सरकार आहे. त्यामुळे लोकांना त्यांना काही देणे-घेणे नाही. लोकांना कसे लुटता येईल, मलाईदार खाते, मालदार जिल्हे कसे मिळतील यावर सगळा जोर सुरु आहे.
... तर नरेंद्र मोदी यांचे अपयश
धारावी अदानीच्या घशात घातले. दोन दिवसापूर्वी तसा जीआर निघाला. अदानी, भाजपाचे नेते आणि निवडणुक आयोग हे ठरलेलं आहे. उद्योगपतींच्या माध्यमातून हे राज्य चालविलं जात आहे. फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत नक्षल संघटना होत्या असा आरोप केला होता. तेव्हा मी त्यांना पत्र पाठवून कुठल्या नक्षल यंत्रणा त्यात सहभागी होत्या याची यादी मागितली होती. तुम्ही गृहमंत्री होता, केंद्रात तुमचे सरकार आहे. मग हे नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे असे त्यांना सांगायचे आहे काय? असा सवालही पटोले यांनी केला.