धर्माबाद तालुक्यात राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:31+5:302020-12-27T04:13:31+5:30

सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार करतात रात्रभर जागरण कुठे विरोधक एक झाले तर, कुठे एक असलेले विरोधक झाले धर्माबाद : ग्रामपंचायतींच्या ...

Political atmosphere heated up in Dharmabad taluka | धर्माबाद तालुक्यात राजकीय वातावरण तापले

धर्माबाद तालुक्यात राजकीय वातावरण तापले

सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार करतात रात्रभर जागरण

कुठे विरोधक एक झाले तर, कुठे एक असलेले विरोधक झाले

धर्माबाद : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावागावात राजकीय वातावरण तापले आहे. मागच्या निवडणुकीत विरोधक असलेले गाव पुढारी कुठे एक झाले तर एक असलेले पुढारी आता विरोधी झालेले चित्र पाहावयास मिळत आहे. यात तरुण पिढी अधिक रस घेत आहे. काही ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचे प्रयत्न केला जात आहेत. सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार रात्री जागरण करून नोंदणी करत आहेत.

धर्माबाद तालुक्यात ४५ ग्रामपंचायती असून त्यातील ४० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असून, त्यातील गावे नायगाव, बेलुरा (खु.)/जाफलापूर, बेलुर (बु.), अल्लूर/नेरली, सिरसखोड/ रामपूर/ रामेश्वर, संगम, मनूर, बामणी (थ.), विळेगाव (थ.), मोकली/कऱ्हाळ, शेळगाव (थ.), पाटोदा (थ.), माष्टी, बाभळी (ध.), पाटोदा(खु.), पाटोदा(बु.), मंगनाळी, अतकुर, चिकना, जारिकोट, दिग्रस, चोंडी, चोळाखा, बेलगुजरी/ हारेगाव, पिंपळगाव, सालेगाव, सायखेड, धानोरा(खु.), विळेगाव(ध.), करखेली, राजापूर, जुन्नी, पांगरी, बाचेगाव, येवती, येताळा, बन्नाळी, कारेगाव व चिंचोली या चाळीस ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.

नामनिर्देशनपत्र भरण्याची लगबग चालू झाली आहे. नामनिर्देशन पत्र ऑनलाइन नोंदणी करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने संगणकासमोर ताटकळत बसावे लागत आहे. दिवसा सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागरण करावे लागत आहे. ऑनलाइनमुळे उमेदवार मेटाकुटीला आले असून, गाव सोडून धर्माबाद शहरात दोन दोन दिवस रात्रभर ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. महिला उमेदवारांना याचा नाहक त्रास होत आहे. चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून, या थंडीत राजकीय वातावरण गरम होत आहे.

धर्माबाद तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण तापले असून डावपेच खेळी सुद्धा रंगली आहे. मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खर्चाचा हिशेब वेळेत दिला नसल्याने अपात्र झालेले उमेदवार थंड पडले आहेत. काही ठिकाणी गावपातळीवर बिनविरोध गाव काढण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण काही गाव पुढारी माझ्या मताचा किंवा मनपंसती उमेदवार नसल्याने बिनविरोध निघताना, विरोध केला जात असून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. निवडणुकीचे राजकीय वातावरण गावागावात तापले असून हातमिळवणी, मनधरणीची लगबग होत आहे. ज्या वाॅर्डात राखीव जागांसाठी उमेदवार जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. निवडणुकीत तरुण वर्ग अधिक रस घेत असून ज्येष्ठ पुढाऱ्यांची नाचक्की करत आहेत. गावपातळीवर आजपर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराचे भांडे उघडे करून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यांनी एवढे पैसे खाल्ले, त्यांनी एवढे पैसे खाल्ले, असे आरोप-प्रत्यारोप गावपुढाऱ्यांत सुरू आहेत. चौदावा वित्त, रोजगार हमी योजना, घरकुल व शौचालय यावर झालेल्या कामांवर अधिक चर्चा रंगत आहे.

२३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरणे, ३१ रोजी अर्जांची छाननी, ४ जानेवारी २०२१ रोजीपर्यंत अर्ज माघारी घेणे, १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

फोटो कॅप्शन - धर्माबाद तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नामनिर्देशनपत्र भरण्याची लगबग चालू झाली आहे; पण सर्व्हर सतत बंद होत असल्याने उमेदरांना रात्री दोन-तीन वाजेपर्यंत थंडीत जागरण करावे लागत आहे.

Web Title: Political atmosphere heated up in Dharmabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.