नांदेड शहरात 6 हजारांवर भाडेकरू परप्रांतीय; घरमालकांनी केवळ 48 जणांची केली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:34 IST2020-12-22T19:31:57+5:302020-12-22T19:34:03+5:30
नांदेड शहरात राहणार्या भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे घरमालकांना फारसे गरजेचे वाटत नसल्याचे चित्र आहे.

नांदेड शहरात 6 हजारांवर भाडेकरू परप्रांतीय; घरमालकांनी केवळ 48 जणांची केली नोंद
नांदेड : शहरात हजारो परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील नागरिक घर भाड्याने घेवून राहतात. त्यापैकी अनेकांनी दुकाने भाड्याने घेवून व्यवसाय थाटले आहेत. परंतु, कोरोना महामारीने लाॅकडाऊन काळात हजारो भाडेकरूंनी घर, दुकाने सोडून आपल्या राज्यात जाणे पसंत केले. आजघडीला सहा हजारावर भाडेकरू हे परप्रांतीय असूनदेखील केवळ ४८ घरमालकांनी पोलीस ठाण्यात नोंद केलेली आहे.
नांदेड हे शैक्षणिक, भाैगोलिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या सोईचे आणि महत्वपूर्ण असल्याने बहुतांश राज्यातील नागरिकांनी नांदेडचे कायमस्वरूपी रहिवाशी होणेही पसंत केले आहे. त्यात त्यांच्या आश्रयाने येणारे हजारो परप्रांतीय हे भाड्याने घरे घेवून राहतात. यामध्ये बिहार, गुजरात, उत्तरप्रादेश, बंगाल, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील बहुतांश नागरिकांचा समावेश आहे. त्यात कोरोना काळात सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेमध्ये हजारो परप्रांतीयांनी परत आपल्या गावी जाणे पसंत केले. परंतु, नांदेड शहरात राहणार्या भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे घरमालकांना फारसे गरजेचे वाटत नसल्याचे चित्र आहे. जवळपास पावणेसात लोकसंख्या असलेल्या नांदेड शहरात केवळ ४८ घरमालकांनीच भाडेकरूंची माहिती नोंदविली आहे. परप्रांतीय तसेच अनोळखी व्यक्ती भाड्याने राहत असेल तर त्याचे ओळखपत्र, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणे आणि ती माहिती पोलीस ठाण्यात देणे कायद्याने गरजेचे आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. त्यामुळे घरमालकांनी कोणताही भाडेकरू ठेवत असताना त्याची सविस्तर माहिती ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सर्वाधिक बिहार, युपीचे
नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरूपैकी सर्वाधिक भाडेकरून हे युपी, बिहार आणि राजस्थानचे आहेत. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तेलंगना, बंगाल, गुजरातच्या नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश जण व्यवसाय, मजूरीच्या शोधात आलेले आहेत.
घरमालक बिनधास्त
घर भाड्याने देताना बहुतांश घरमालक बिनधास्त असतात. परजिल्ह्यातून अथवा परप्रांतातून आलेल्या भाडेकरूंची चाैकशी करण्यापेक्षा अधिक घरभाडे देणार्या भाडेकरूंना पसंती देण्याचा कल असतो. त्यामुळे त्यांच्याकडून ओळखपत्र घेणे अथवा भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे दुरच राहिले. माहिती न देणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
घरमालकाने भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश घरमालक याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा एखादी घटना, गुन्हा घडतो. तेव्हा त्यांना जाग येते. घर भाड्याने देताना संबंधीतांचे ओळखपत्र घ्यावे, त्याचे चारित्र्य तपासावे, तसेच सदर माहिती ठाण्याला देखील द्यावी.
- द्वारकादास चिखलीकर, पो. नि.