केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीच्या दराने धान्य मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:44+5:302021-05-28T04:14:44+5:30
नांदेड- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याचा निर्णय ...

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीच्या दराने धान्य मिळणार
नांदेड- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत
समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या
दराने अन्नधान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा
जिल्ह्यातील ४ लाख ८३ हजार ४८७ केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केशरी शिधापत्रिकाधारकांना
मे २०२० ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या
दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र, या योजनेअंतर्गत
वितरित करण्यात आलेल्या अन्नधान्याची उचल व एकूण वाटप पाहता या
योजनेतील अन्नधान्य अनेक जिल्ह्यांत शिल्लक असल्याने शिल्लक असलेले
धान्य वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एपीएल (केशरी)
शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ या
प्रमाणे दोन किलो अन्नधान्य जून २०२१ करिता सवलतीच्या दराने वाटप केले
जाणार आहे. गहू ८ रुपये प्रति किलो, तर तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने
वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यात या योजनेचा ३२२ मे. टन तांदूळ
शिल्लक आहे, तर ५१३ मेट्रिक टन गहू शिल्लक आहे.
चौकट-------------
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत,
तसेच शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी)
शिधापत्रिकाधारकांना जिल्ह्यातील शासकीय गोदामामध्ये, तसेच रास्त भाव
दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्नधान्याचे जून २०२१मध्ये सवलतीच्या
दराने धान्य वाटप केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात
काटेकोरपणे केली जाईल.
- लतिफ पठाण,
जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड.